राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे ‘रिच टू अनरीच्ड’ अभियान
गोसेखुर्द प्रकल्पातील जलपर्णीच्या समस्येतून स्थानिक युवकांसाठी शोधणार रोजगाराच्या संधी – कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी
नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पातील जलपर्णीच्या समस्येतून स्थानिक सुशिक्षित युवकांकरिता रोजगाराच्या संधी शोधणार असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी काही तालुक्यातील बुडीत क्षेत्रातील गावांना दिलेल्या भेटी दरम्यान दिली. शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विद्यापीठाकडून ‘रिच टू अनरीच्ड’ अभियान राबविले जात आहे. या अभियानाचा भाग म्हणून माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी गोठणगाव, पांढरगोटा, राजुरी आदी गावांना भेटी देत स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधला.
या भेटी दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या समवेत विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, शताब्दी महोत्सव समिती मुख्य समन्वयक डॉ. संतोष कसबेकर उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत दिलेले ग्रामविकासाचे सूत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ‘रिच टू अनरीच्ड’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नरत आहे.
पांढरगोटा येथे कुलगुरू डॉ. चौधरी, अधिष्ठाता डॉ. कडू व डॉ. कसबेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर श्री लेमदेव पाटील महाविद्यालयात संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. बाबासाहेब तीतरमारे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. चक्रधर तीतरमारे, सचिव भोजराज चारमोडे, प्राचार्य डॉ. रणदिवे व प्राध्यापक वर्ग यांनी त्यांचे स्वागत केले. कुलगुरू डॉ. चौधरी यांनी संवाद साधताना गावा-गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करीत कच्च्या मालांपासून किंवा टाकाऊ वस्तूंपासून आवश्यक वस्तूंची पुनर्निर्मिती कशी करू शकतो, याबाबत माहिती दिली. देशाला आत्मनिर्भर बनवण्याकरिता गावागावांमध्ये रोजगार निर्मिती कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वसा चालविणे व ग्राम-ग्रामाचा उद्धार करण्याकरिता महाराजांच्या विचाराबद्दल संदेश दिला. डॉ. कसबेकर यांनी गावागावांमध्ये महाविद्यालयातर्फे विविध कार्यक्रमाची आयोजन करण्यात यावे. वृद्धांच्या डोळ्यांच्या समस्या बाबत नेत्र तपासणी, चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करावे. सिकलसेल असलेल्या तरुण-तरुणीचे तपासणी शिबीर आयोजित करण्याबाबत विचार व्यक्त केले.