हेक्सावेअर टेक्नॉलॉजीसचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कॅम्पस ड्राईव्ह
दीक्षांत सभागृहात आयोजित ड्राईव्हला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील रोजगार व प्रशिक्षण मेळाव्याच्या वतीने आयोजित हेक्सावेअर टेक्नॉलॉजीस लिमिटेड या कंपनीच्या कॅम्पस ड्राईव्हला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महाराज बाग येथील दीक्षांत सभागृहात शुक्रवार, दिनांक २८ जुलै २०२३ रोजी हा कॅम्पस ड्राईव्ह पार पडला.विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व प्रशिक्षण विभाग विद्यापीठात सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा म्हणून या विभागामार्फत रोजगार मेळावे आयोजित केले जातात.
या अनुषंगाने हेक्सावेअर टेक्नॉलॉजीस लिमिटेड या कंपनीच्या वतीने आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत आवाज प्रक्रियेसाठी कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह या पदाकरिता ह्या मुलाखती घेण्यात आल्या. हेक्सावेअर टेक्नॉलॉजीस कंपनीच्या अधिकारी सुरुची डंभारे, अंजली जेठानी, तयबा खान यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी प्रशिक्षण व रोजगार अधिकारी डॉ. भूषण महाजन उपस्थित होते. या कंपनीच्या मुलाखतीकरिता एकूण ८१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. शुक्रवारी झालेल्या मुलाखतीकरिता २१७ विद्यार्थी उपस्थित झाले होते. यामधून ५५ विद्यार्थ्यांची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली आहे. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची अंतिम निवड करीता मुलाखत घेतली जाणार आहे. त्यामधून विद्यार्थ्यांची निवड या पदाकरिता केली जाईल.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी अभिनंदन केले.