अमरावती विद्यापीठातर्फे प्रज्ञाचक्षू श्री संत गुलाबराव महाराज व्याख्यानमालेचे आयोजन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने स्व वासुदेवराव राजारामजी देशमुख यांच्याकडून प्राप्त झालेल्या दाननिधीमधून ‘प्रज्ञाचक्षू श्री संत गुलाबराव महाराज’ व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प शुक्रवार दि 23 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी 12:00 वाजता सहकार महर्षी स्व भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, खामगांव, जि बुलढाणा येथे आयोजित करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते भूषविणार असून ‘श्री संत गुलाबराव महाराजांची समाजाभिमुखता’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून माजी न्यायमूर्ती सुदाम देशमुख अभ्यासपूर्ण व्याख्यान देतील. प्रथम पुष्पाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, सहकार महर्षी स्व भास्करराव शिंगणे आरोग्य व शिक्षक प्रसारक मंडळ, खामगांव, जि बुलढाणाचे अध्यक्ष राजेंद्र शिंगणे व दानदात्यांचे प्रतिनिधी तथा माजी प्राचार्य डॉ अरविंद देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प शनिवार, दि 24 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता गो सी टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदुर बाजार, जि अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते भूषविणार असून ‘श्री संत गुलाबराव महाराजांची समाजाभिमुखता’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून माजी न्यायमूर्ती सुदाम देशमुख अभ्यासपूर्ण व्याख्यान देतील. द्वितीय पुष्पाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, गो सी टोम्पे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्ट, चांदुर बाजार, जि अमरावतीचे अध्यक्ष भाष्करदादा टोम्पे व दानदात्यांचे प्रतिनिधी तथा माजी प्राचार्य डॉ अरविंद देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
व्याख्यानमालेच्या प्रथम व द्वितीय पुष्पाला सर्व नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ अविनाश असनारे, सहकार महर्षी स्व भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, खामगांव, जि बुलढाणाचे प्राचार्य डॉ संजय पाटील व गो सी टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदुर बाजार, जि अमरावतीचे प्राचार्य डॉ आर एस रामटेके यांनी केले आहे.