सोलापूर विद्यापीठात खेळाडू, प्रशिक्षकांचा झाला सन्मान

जानेवारीपासून खेळाडूंना जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करून देणार – कुलगुरु प्रा महानवर

संगमेश्वर कॉलेजने पटकाविले प्रा पुंजाल फिरता चषक

सोलापूर : जीवनात खेळास अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे खेळाडूंचे सामाजिक महत्व वाढत असते. सोबतच खेळातील प्राविण्‍यामुळे शहराचे, प्रांताचे आणि राष्ट्राचे नाव उंचावत असते. अशा या खेळाडूंमुळे विद्यापीठास यंदाच्या वर्षी 33 पदके प्राप्त झाली. आता या खेळाडूंना पुढील डिसेंबर-जानेवारी महिन्यापासून विद्यापीठातील इंडोयर मल्टीपर्पज हॉलमध्ये जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांनी केले.सोलापूर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, कुलगुरू प्रा प्रकाश महानवर, राष्ट्रीय क्रीडा दिन, ब्रिजमोहन फोफलिया, खेलो इंडिया, खेळ कट्टा,

मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात कुलगुरु प्रा प्रकाश महानवर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया, विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ केदारनाथ काळवणे यांची प्रमुख उपस्थित होती.

Advertisement

भारतीय विश्वविद्यालय संघ आयोजित वेस्ट झोन, साऊथ वेस्ट झोन, ऑल इंडिया, खेलो इंडिया व राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव तसेच आंतरविद्यापीठ विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील खेळाडू, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ ठरलेल्या संगमेश्वर महाविद्यालयाला पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ ऋतुराज बुवा व त्यांच्या संघाने हा पुरस्कार स्वीकारला.

कुलगुरू प्रा महानवर म्हणाले की, जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येकाचा खेळाशी संबंध येतो. आज ग्रामीण भागातील विविध प्रकारचे खेळ मोबाईलच्या अतिवापरामुळे लोप पावत आहेत. खेळामुळे चांगला व्यायाम होतो तसेच शारीरिक व मानसिक संतुलनही चांगले राहते. येथील खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्यासाठी निश्चितच आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

ब्रिजमोहन फोफलिया म्हणाले की, आई, वडील व गुरुजनांमुळे चांगला विद्यार्थी व चांगला खेळाडू घडतो. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने खेळामध्ये चांगली प्रगती केली आहे. आई-वडिलांच्या कष्टातून घडल्यानंतर विद्यार्थी व खेळाडू यशस्वी होत असतो. माणूस मोठा झाल्यानंतर जन्म दिलेल्या आई-वडिलांना विसरू नये. त्यांची प्रामाणिकपणाने सेवा करावी. आज समाजात संस्काराची हानी होत असल्याबद्दल फोफलिया यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. खेळाडू विद्यार्थिनी संतोषी देशमुख यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. तसेच यावेळी कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा आणि विविध पदवी प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा देवानंद चिलवंत, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा सचिन गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे संचालक, प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ तेजस्विनी कांबळे व प्रा ममता बोल्ली यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page