एमजीएम विद्यापीठात ‘अनवट शांताबाई’ या विशेष सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : यशवंतराव चव्हाण सेंटर, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय व मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ कवयित्री व लेखिका दिवंगत शांताबाई शेळके यांचा लेखन प्रवास उलगडणाऱ्या ‘अनवट शांताबाई’ या विशेष सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शनिवार, दि २७ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता आईन्स्टाईन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे सदरील कार्यक्रम संपन्न होणार आहे.

Advertisement

शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आलेली होती. शांताबाईंचे जगणे आणि त्यांची कविता यांचा अनुबंध शांताबाईंच्याच शब्दांतून मांडला जाणार आहे. शांताबाईंचे ‘धुळपाटी व संस्मरणे’ हे आत्मचरित्रपर लेखन आणि त्यांच्या कविता या कार्यक्रमात सादर केल्या जातील. कार्यक्रमाची संहितालेखन डॉ. वंदना बोकिल-कुलकर्णी यांनी केले आहे. त्यांच्यासह अनुराधा जोशी, गौरी देशपांडे आणि दिपाली दातार सादरीकरण करणार आहेत. त्यांना व्हायोलिनची साथ अनुप कुलथे हे देणार आहेत.

सदरील कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला असून साहित्य रसिकांनी या विशेष प्रयोगास उपस्थित रहावे, असे आवाहन चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, सल्लागार नंदकिशोर कागलीवाल, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, सचिन मुळे, दासू वैद्य, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. आशिष गाडेकर, नीलेश राऊत, डॉ. रेखा शेळके, प्रेरणा दळवी, डॉ. आनंद निकाळजे, डॉ. कैलास अंभुरे, शिव कदम, सुबोध जाधव, नीना निकाळजे, वैशाली बावस्कर आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page