सौ के एस के महाविद्यालयात नाटयकला शिबीराचा थाटात समारोप
बीड : बाल रंगभूमी परिषद, बीड आणि नाटयशास्त्र विभाग सौ के एस महाविद्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यकला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दि 30 एप्रिल 2024 रोजी शिबिराचा समारोप सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ दीपाताई क्षीरसागर, अध्यक्ष बालरंगभूमी शाखा बीड या उपस्थित होत्या. भाषणात त्या म्हणाल्या की नाटक, संगीत, नृत्य, चित्रकला या सर्व कला मानवाच्या जिवनातील अविभाज्य घटक आहे. मूल जन्मतःताच निरीक्षणाला सुरूवात करते. त्यातून विविध गोष्टी आत्मसात करते. हा त्याचा नाटयकलेचा पहिला धडा असतो. कलेमार्फत बालकांचा भावनिक विकास होतो तर क्रिडेमार्फत शारीरिक विकास होतो. पण आता दुर्देवाने आमच्या शालेय अभ्यासक्रमातून या बाबी काही दुर्लक्षित झालेल्या आहेत. शिवाय मोबाईलचे वेड लहानमुलाना या सर्वापासून दूर नेत आहे. त्यासाठी मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्याला वेगळे प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने बालरंगभूमी परिषद, बीड व नाटयशास्त्र विभाग यांच्या वतीने नाटयकला शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ दीपाताई क्षिरसागर यांनी पालकांशी संवाद साधला. पालकांकडून मुलांच्या काही समस्या जाणून घेतल्या व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनीही मुलांना वेळ दिला पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. काही गोष्टी जर मुलं लपवत असतील तर, ते सुद्धा त्यांच्याकडून काढून घेता आलं पाहिजे; अशा पद्धतीने डॉ दीपाताई क्षिरसागर यांनी पालकांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मुलांच्या विकासात पालकांची भूमिका अग्रण्य असते. मी खरच कौतुक करतो की, पालकांनी या शिबीरासाठी आपल्या पाल्यांना पाठवले. आजचे पालक जागरूक आहेत आणि ते आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ दुष्यंता रामटेके यांनी शिबीरातील प्रशिक्षणाचा आढावा सांगितला. मी, अभिनयकला आणि अभिनयाचे तंत्र, अनुराधा चिंचोलकर यांनी शास्त्रीय नृत्य, एजाज अली यांनी कॅमेरा फेसिंग, कविता दिवेकर यांनी रंगभूषा तर अमित गाढे यांनी चित्रकला व पेंटिंग याची प्राथमिक माहिती देऊन शिबिरार्थीकडून प्रात्यक्षिकही करवून घेतले आणि आज समारोपासाठी सादरीकरण सुद्धा बसवून घेतल्याचे सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती स्तवन म्हणून झाली त्यानंतर ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ हे प्रार्थना गीत सादर करण्यात आले. ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’ या कथेवर आधारित नाटिका विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आली. मोबाईल बघून मुलं मैदानी खेळ विसरत चाललेले आहेत आणि आपण मोबाईलचा वापर कामापुरताच कमी केला पाहिजे, यावर आधारित छोटी नाटिका ही सादर करण्यात आली याशिवाय काही नाट्यछटा, गीतं आणि नृत्य ज्यामध्ये ‘असावा सुंदर चॉकलेट चा बंगला’, ‘सांग सांग भोलानाथ’ हे देखील सादर करण्यात आले. कार्यक्रमात 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे पूर्ण संयोजन आणि सूत्रसंचालन डॉ दुष्यंता रामटेके यांनी केले तर आभार डॉ अनिता शिंदे यांनी केले
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर संचालक डॉ सतिश माऊलगे, कमवि उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, डॉ सुधाकर गुट्टे, डॉ व्ही टी देशमाने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नामदेव साळुंके, प्रा विजयकुमार राख, प्रा सुरेश थोरात, प्रा रुख्मिनीकांत पांडव, प्रा इंद्रजित भालेराव, कबीर जाधव, कुमारी सृष्टी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पालक, बीड शहरातील कला रसिक, नागरीक, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.