डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात राष्ट्रीय पर्यावरण युवा संसद फेरी संपन्न
– विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात आयोजन
नागपूर : राष्ट्रीय पर्यावरण युवा संसदेचे आयोजन जानेवारी २०२४ मध्ये करण्यात आले आहे. या राष्ट्रीय पर्यावरण युवा संसदेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यापीठ स्तर फेरीत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात ही विद्यापीठ स्तर फेरी नुकतीच पार पडली. या फेरीतून विभागीय फेरीसाठी १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून राष्ट्रीय पर्यावरण युवा संसदेचे आयोजन केले जाते. पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या ‘स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट’ संस्थेकडून राष्ट्रीय पर्यावरण संसद २०२४ चे नियोजन व आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ स्तरावरील फेरीसाठी प्रमुख अतिथी म्हणून भारताचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी नियुक्त केलेले स्वच्छता अँबेसिडर तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य श्री. राज मदनकर हे उपस्थित होते. यावेळी परीक्षक म्हणून डॉ. विद्या हरदास, डॉ. प्रतीक लापसे व प्रणिती लवंगे यांनी कार्य सांभाळले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविशंकर मोर यांच्या अध्यक्षतेखाली ही फेरी पार पडली. यावेळी स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंटचे राष्ट्रीय सहसमन्वयक श्री. मयूर जव्हेरी, पश्चिम विभागीय समन्वयक श्री. अबुझर हुसेन यांची उपस्थिती होती.
आगामी जानेवारी महिन्यामध्ये आयोजित राष्ट्रीय पर्यावरण युवा संसदेमध्ये १३० विद्यापीठांमधून विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व स्टुडन्ट फॉर डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात या विद्यापीठ स्तर फेरीचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठ स्तर फेरी व त्यानंतर विभागीय फेरी मधून उत्कृष्ट विद्यार्थ्यांची या राष्ट्रीय पर्यावरण संसदेसाठी निवड करण्यात येते. विद्यापीठ स्तरावरील फेरीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिक्षेत्रातील नागपूर, भंडारा, गोंदिया व वर्धा जिल्ह्यातील ४२ महाविद्यालये सहभागी झाले. विद्यापीठ स्तर फेरीमध्ये आयोजित स्वयंस्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत एकूण ८४ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून विभागीय फेरीसाठी १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार प्रा. मृण्मयी कुकडे यांनी मानले.