महात्मा फुले कृषि विद्यापीठात ६४ वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

राज्याच्या कृषि विकासात महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे भरीव योगदान – कुलगुरु डॉ पी जी पाटील

राहुरी : महाराष्ट्र राज्य संतांची भूमी आहे. हे राज्य घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मावळे यांच्या कर्तृत्व व बलीदानाने राज्य उदयास आले. समाजसुधारक महात्मा फुले, शाहु महाराज व डॉ आंबेडकर यासारख्या थोर व्यक्तींमुळे राज्याला दिशा मिळाली. या राज्याच्या कृषि क्षेत्राच्या प्रगतीसाठी राज्यातील चारही कृषि विद्यापीठांचे मोठे योगदान आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने स्थापनेपासून संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यामध्ये भरीव असे योगदान दिले आहे.

३०० पेक्षा अधिक विविध पिकांचे वाण व विविध कृषी अवजारे विकसित करून राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात मोठे योगदान दिले आहे. कृषिमधील डिजीटल तंत्रज्ञानामध्ये हे विद्यापीठ अग्रेसर आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीसमोर असणाऱ्या आव्हानांचा मुकाबला विद्यापीठ संपूर्ण योगदानासह करीत आहे. अशा प्रकारे राज्याच्या कृषि विकासात महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे भरीव योगदान असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी जी पाटील यांनी केले.

Advertisement

महात्मा फुले कृषी विद्यापीठात ६४ वा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ पी जी पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता व विस्तार शिक्षण संचालक डॉ श्रीमंत रणपिसे, कुलसचिव अरुण आनंदकर, नियंत्रक सदाशिव पाटील, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ विठ्ठल शिर्के, निम्नस्तर कृषी शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ साताप्पा खरबडे व कुलगुरूंचे विशेष कार्य अधिकारी डॉ महानंद माने उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर विद्यापीठाच्या कम्युनिटी रेडिओ स्टेशन फुले कृषि वाहिनी ९०.८ एफ एम चा फुले कृषि वाहिनी युट्युब चॅनेलचे उद्घाटन कुलगुरू डॉ पी जी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलगुरु म्हणाले की फुले कृषि वाहिनी ९०.८ एफ एम द्वारे कृषि विषयक, समाज प्रबोधन विषयक, व्यक्तीमत्व विकास विषयक विविध कार्यक्रम प्रसारीत केले जातात. आता ही वाहिनी फुले कृषि वाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजपासून आपल्या भेटीस येत आहे. हे फुले कृषि वाहिनी युट्यूब चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यानंतर उद्यानविद्या विभागाच्या टेकडी प्रक्षेत्रावरील २.४८ कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्याचे उद्घाटन तसेच सेंद्रिय शेती प्रकल्पामधील बायोचार युनिट, फिरते रसवंतीगृह व गांडूळ खत चाळणी युनिटचे उद्घाटन कुलगुरू डॉ पी जी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कुलगुरुंनी ड्रोन पायलट ट्रेनींग सेंटरलाही भेट दिली. विद्यापीठात झालेल्या ध्वजारोहनाच्या कार्यक्रमास विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे व एन सी सी अधिकारी डॉ सुनिल फुलसावंगे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page