उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, जळगाव यांच्यात सामंजस्य करार
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, जळगाव यांच्यात दि १२ ऑगस्ट २०२४ रोजी कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
सदर सामंजस्य करारावर हस्ताक्षर करण्यासाठी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रभारी अधिष्ठाता डॉ अभिजित अहिरे, संस्कृत संहिता सिद्धांत विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ राजेश कोलारकर, प्र- कुलगुरू प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील, आंतर विद्या प्रशाळेच्या संचालक डॉ मनिषा इंदाणी, डॉ राजेश जवळेकर, योगशास्त्र विभागप्रमुख इंजि राजेश पाटील, डॉ लीना चौधरी, प्रा गीतांजली भंगाळे यांची उपस्थिती होती.
योग आणि आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व विद्यापीठाचा योगशास्त्र विभाग या सामंजस्य करारांमुळे जोडले गेल्यामुळे दोन्ही प्राचीन पद्धतींचा अवलंब करून रोग निवारण चांगल्या पद्धतीने साधले जाईल. या करारामुळे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग तसेच विविध वैद्यकीय चाचण्यांच्या सहाय्याने संशोधनाच्या विविध संधी, ज्ञानाची देवाणघेवाण, तसेच विविध खर्चिक वैद्यकीय चाचण्या व उपकरणे संशोधनासाठी सहज उपलब्ध झाल्यामुळे रोगनिवारण होऊन शारीरिक व मानसिक स्वास्थ लाभ आयुर्वेद व योग यांच्याद्वारे उत्तमप्रकारे साधले जाईल अशी अपेक्षा आहे.