उच्च शैक्षणिक दर्जा जपत विद्यापीठाने कायम विद्यार्थी केंद्रित धोरणे राबवली – कुलपती अंकुशराव कदम
एमजीएमच्या डॉ.जी.वाय पाथ्रीकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम संपन्न
छत्रपती संभाजीनगर, दि.१५ : आपले भविष्य उज्ज्वल असून आपला उच्च शिक्षणाचा प्रवास आजपासून सुरू होत आहे. विद्यापीठ आपल्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून आपले विद्यापीठात स्वागत आहे. येणारा काळ पाहता विद्यार्थ्यांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे, असे प्रतिपादन महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी केले.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या डॉ.जी.वाय.पाथ्रीकर संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सन २०२३ – २४ या वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम आज विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कुलपती श्री. कदम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, अधिष्ठाता डॉ. प्राप्ती देशमुख, विभागप्रमुख डॉ.संजय आझादे, विभागप्रमुख डॉ, सतीश संकाये, समन्वयक प्रा. निरुपमा पाटोदकर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कदम म्हणाले, एमजीएम विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले विद्यापीठ आहे. परिसर मुलाखतीतून निवड झालेले आपले विद्यार्थी आज जगभरात काम करीत आहेत. उच्च शैक्षणिक दर्जा जपत विद्यापीठाने कायम विद्यार्थी केंद्रित धोरणे राबवली असून विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात जे काही व्हायचे आहे, त्या विशिष्ट क्षेत्राचे शिक्षण इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. विद्यार्थ्याने विद्यापीठात एकदा प्रवेश घेतला की तो उत्तम खेळाडू, उत्तम चित्रकार, उत्तम कलाकार, उत्तम अभियंता, उत्तम संगीतकार, उत्तम व्यावसायिकासह एक सर्वगुणसंपन्न माणूस म्हणून बाहेर पडताना दिसतो.
विद्यार्थ्यांनी वर्गातील शिक्षणासह विद्यापीठात उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांचा उपयोग करून घ्यावा. विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपले अभ्यासक्रम तयार केले असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यापीठात आंतरविद्याशाखीय आणि बहूविद्याशाखीय शिक्षण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे श्री. सपकाळ यांनी यावेळी सांगितले. सपकाळ म्हणाले, आपण काय बनतो यापेक्षा आपल्याला काय बनायचे आहे हे महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून या नवीन प्रवासाची सुरुवात करावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी संशोधन आणि नाविन्यतेकडे लक्ष देत सध्याच्या काळामध्ये आपल्या क्षेत्रात होत असलेले बदल आणि विकास याकडे लक्ष देत आपल्या अभ्यासाची दिशा ठरवणे गरजेचे आहे. स्वत:ला समृद्ध करीत हा शिक्षणाचा प्रवास विद्यार्थ्यांनी आनंददायी करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी या इंडक्शन प्रोग्राममध्ये योगा, एनएसएस, एनसीसी, योग, क्रीडा, झुंबा, ईआरपी, नवीन शैक्षणिक धोरण या संदर्भात जाणून घेतले. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ.प्राप्ती देशमुख, सूत्रसंचालन मुक्ताई मालपाणी व आभार प्रदर्शन साकार मुंगळे यांनी केले.