एमजीएम विद्यापीठात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या चिंतनगाह येथे सामाजिक कार्यकर्त्या डॉ शोभा शिराढोणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन एमजीएम वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ एच एच शिंदे, अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, अधिष्ठाता डॉ प्राप्ती देशमुख, अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते. यावेळी, डॉ शिराढोणकर यांनी ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची वैशिष्ट्ये’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.विद्यापीठ कट्टा, छत्रपती संभाजीनगर, एमजीएम विद्यापीठ, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, डॉ शोभा शिराढोणकर, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, हैदराबाद मुक्तिसंग्राम,
डॉ शिराढोणकर म्हणाल्या, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा हा लोकसमुहाने दिलेला हा लढा आहे. लोकशाहीमध्ये लोक हा शब्द खूप महत्वपूर्ण आहे. या लोक शब्दाची व्याप्ती जितकी वाढत जाईल, जितकी सखोल होत जाईल तितकी लोकशाही सुदृढ होत असते. मराठवाड्याच्या गुलामीचा इतिहास फार मोठा असून यामध्ये ७०० वर्षे निजामाचा आणि १५० वर्षे इंग्रजाच्या राजवटीचा इतिहास राहिलेला आहे. मराठवाड्याच्या बाबतीत कायम मागासलेला हा शब्द वापरण्यात येत असतो. या मागासलेपणाचे मूल्यमापन आजच्या वित्तीय भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये जो काही समाज विकसित झालेला आहे त्या विकसित समाजाच्या पार्श्वभूमीवर आपण मराठवड्यातील लोकांना मागासलेले म्हणतो. मात्र, मराठवड्याला मागासलेले म्हणणे चुकीचे आहे.
लोकशाही विचारांचा जो विकास भारतीय, महाराष्ट्रीय आणि मराठवाड्यातील समाजात झालेला आहे, जे प्रबोधन येथे झाले आहे ते प्रबोधन खूप महत्वपूर्ण आहे. मराठवाड्याची लोक शिक्षणाची एक परंपरा राहिलेली आहे. मराठवाडा ही संतांची भूमी राहिलेली आहे. शासकीय व्यवस्था ही गुलामीची राहिलेली आहे. परंतु मराठवाड्याच्या लोकसमूहात तळागाळात रुतलेली एक लोक विलक्षण अशी ज्ञान परंपरा आहे. या ज्ञान परंपरेचे आपण वारसदार असल्याचे डॉ शिराढोणकर यांनी यावेळी सांगितले.
कुलगुरू डॉ विलास सपकाळ यावेळी बोलताना म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यामध्ये असंख्य हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. इतिहास नेहमीच भविष्यासाठी वर्तमानात आपल्याला दिशादर्शन करीत असतो. या लढ्याचे नेतृत्व स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले होते. त्यांनी “युवकांनो लक्षात ठेवा जुलूम आणि अन्याय यांचा प्रतिकार करणे म्हणजेच ईश्वरभक्ती आहे.” हा दिलेला विचार कायम लक्षात ठेवत मार्गक्रमण करीत राहिले पाहिजे. समकालीन काळामध्ये मराठवाड्यात उपलब्ध असलेल्या संसाधनांचा आणि संधीचा योग्यप्रकारे वापर करीत, आपल्या जीवनाची दिशा ठरवली पाहिजे. विशेषत: आपल्या परीने शक्य तितके देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे. शिक्षण क्षेत्रासह मराठवाडा आज सर्वच क्षेत्रात प्रगती करीत आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रत्येकांनी कशा पद्धतीने योगदान देऊ शकतो, हा विचार सर्वांनी करणे काळाची गरज आहे. आज आपण आरोग्य, सहकार, उद्योग, क्रीडा, कृषी अशा सर्वच क्षेत्रात प्रगती केली असून आपल्याला लाभलेला समृद्ध वारसा जपत पुढे जाणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ रेखा शेळके यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा डॉ आशा देशपांडे यांनी केले.
पुस्तक प्रकाशन :
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात डॉ वि ल धारूरकर आणि डॉ बि एम कोकरे लिखित ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.