एमजीएम विद्यापीठात विद्यार्थ्यांशी साधला मकरंद अनासपुरे यांनी संवाद
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठात ‘राजकारण गेलं मिशीत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त शनिवार, दि २० एप्रिल २०२४ रोजी विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात आयोजित कार्यक्रमात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई आणि ‘राजकारण गेलं मिशीत’ या चित्रपटाची सर्व टीम, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले, २००८ साली ग्रामीण साहित्यिक रा रं बोराडे यांनी लिहिलेली ग्रामीण कलाकृती ‘आग आग मिशी’ हा कथासंग्रह मला अर्पण केला होता. मराठवाड्यातील कलाकारांना सोबत घेऊन काही तरी वेगळं करावे, अशी मनात इच्छा होती. ही माझी इच्छा आज ‘राजकारण गेलं मिशीत’ चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. हा चित्रपट रा रं बोराडे यांच्या ‘आग आग मिशी’ या कथासंग्रहावर आधारित आहे. विशेषत: आजच्या राजकारणाचे संदर्भ यास जोडलेले आहेत. सर्वांनी हा चित्रपट चित्रपटात जाऊन पाहावा, असे आवाहन मी या माध्यमातून करतो.
एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा डॉ राजू सोनवणे हे या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. यावेळी त्यांनी चित्रपटातील त्यांचे डायलॉग म्हणून दाखविले आणि या चित्रपटात काम करताना त्यांना आलेले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी चित्रपटात काम केलेल्या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागप्रमुख डॉ शिव कदम यांनी तर आभार प्रा डॉ राजू सोनवणे यांनी मानले.