अमरावती विद्यापीठातील डॉ आंबेडकर विचारधारा विभागात व्याख्यान संपन्न
कृत्रिम बुध्दिमत्तेचे सामाजिक न्यायाला आव्हान – मिलींद कीर्ती
अमरावती : वर्तमान स्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भात संपूर्ण जगात संधी आणि धोके यावर विचारमंथन होत असून रोजगाराच्या क्षेत्रातही एआय मुळे मोठे बदल घडून येतील, परंतु यातून सामाजिक न्यायाच्या संदर्भात मोठे धोके निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही”. सामाजिक न्यायाची आजही आणि भविष्यात सामान्य आणि गरीब जनतेला मूलभूत गरज आहे. यासाठी सामाजिक न्याय ही संकल्पना समजून घेणे आणि या संदर्भात सतत जागरूक राहण्याची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवी कल्याणाच्या विरोधातील वापर टाळण्याच्या दृष्टीने सरकारची महत्वाची भूमिका आहे, अशा आशयाचे विचार नागपूर येथील मिलींद कीर्ती यांनी व्यक्त केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत एमए डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागातर्फे आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणि सामाजिक न्याय’ या विषयावर अतिथी व्याख्यान देतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे समन्वयक डॉ रत्नशील खोब्रागडे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ बी आर वाघमारे, डॉ वामन गवई, डॉ पवनकुमार तायडे, प्रा सुरेश पवार, प्रा वरघट, प्रा ओमप्रकाश झोड, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष इंजि उमेश शहारे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणातून डॉ रत्नशील खोब्राागडे म्हणाले, “डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाला सामोरे जाण्याची शक्ती असून विद्यार्थ्यांनी याची जाण ठेऊन वर्तन केल्यास सामाजिक न्यायाचे संरक्षण होऊ शकेल. प्रास्ताविक उमेश शहारे यांनी केले. प्रमुख वक्ते, शिक्षकांचा अभ्यास मंडळाच्यावतीने पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कुमुद गाडे यांनी गायिकेल्या भीमगीताने झाली. नम्रता खंडारे यांनी मिठाईचे वाटप केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता मंडे, तर आभार वाल्मिक डवले यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला डॉ हेमंत खडके, अमरावती शहरातील गणमान्य नागरिक तसेच विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.