एमजीएम विद्यापीठात विद्यार्थ्यांना विकसित करता येणार कांजीवरम निर्मीतीचे कौशल्य
एमजीएममधील कांजीवरम सिल्क लूम इलेक्ट्रॉनिक जकार्टचे लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापिठाच्या लिओनार्दो दा विंची स्कूल ऑफ डिझाईनमधील कांजीवरम सिल्क लूम इलेक्ट्रॉनिक जकार्टचे लोकार्पण आज विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, एमजीएम स्कुल संचालिका डॉ अपर्णा कक्कड, अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, अधिष्ठाता डाॅ एच एच शिंदे, प्रकल्प संचालक, अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, खादी विभाग संचालक शुभा महाजन, इन्स्टिट्यूट ऑफ हाॅटेल मॅनेजमेंटचे संचालक डॉ कपिलेश मंगल, क्रीडा विभाग संचालक नितीन घोरपडे, स्कूल ऑफ फिल्म आर्टचे प्रमुख प्रा शिव कदम तसेच प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, या तंत्रज्ञानाचा समावेश करून, एमजीएम विद्यापीठ पारंपरिक कलात्मकतेचे जतन करत रेशीम विणकामात कार्यक्षमता आणि नाविन्यपूर्णता विकसित केली जाणार आहे. एमजीएम विद्यापीठामधील सर्व विद्यार्थ्यांना यावेळी खादी बरोबर कांजीवरम सिल्क निर्मीतीचे तज्ज्ञांकडून शिक्षण घेता येणार आहे. तसेच विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कांजीवरम निर्मीतीचे कौशल्य विकसित करता येणार आहे.
मराठवाडा आणि परिसरातील रेशीम विणकरांसाठी कौशल्य विकास आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण संधी याद्वारे निर्माण झाली आहे, असे या प्रकल्पाची माहिती देताना कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी सांगितले. यावेळी बोलताना अधिष्ठाता डाॅ जाॅन चेल्लादुराई म्हणाले, पारंपरिक कारागिरीचा सन्मान करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून रेशमी साड्या बनवण्याच्या पैठणी शैली सारख्या पारंपरिक कलेला प्रोत्साहन देण्यासाठी एमजीएम कांजीवरम सिल्क लूम इलेक्ट्रॉनिक जकार्टची स्थापना करण्यात आली आहे.