एमजीएम विद्यापीठात जलनेति कार्यशाळा उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या योग विज्ञान विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या जलनेति कार्यशाळेमध्ये योग प्रेमी, योग साधक आणि योग शिक्षकांनी प्रत्यक्ष सराव करून जलनेतिचा अनुभव घेतला. योगिक जीवनशैलीत शुद्धीकरण प्रक्रियेला खूप महत्त्व दिले गेले असून शुद्धीकरण प्रक्रियेतील एक महत्त्वाची प्रक्रिया म्हणून जलनेतिकडे पाहिले जाते.
आपल्या सायनसच्या पोकळ्या अशुद्धतेने अडकतात ज्यामुळे संक्रमण, डोकेदुखी आणि जळजळ होऊ शकते. जलनेति हे एक नैसर्गिक तंत्र आहे, ज्याचा उपयोग योग साधकांनी रोगमुक्त राहण्यासाठी केला आहे. तज्ञ योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली जलनेति शिकून त्याचा नियमित सराव केल्यास श्वसनविकार हळूहळू नाहीसे होण्यास मदत होते.
त्याचप्रमाणे जलनेति नाकातील स्लेष्मासह अडकलेली घाण आणि जिवाणू काढून टाकून नाकाची स्वच्छता राखण्यास मदत करते. हे श्वसन विकारांसाठी एक उत्तम साधन आहे. श्वासोच्छ्वास सुलभ करण्यासाठी तसेच दम्याचा सामना करण्यासाठी ही एक खूप प्रभावी अशी पद्धत आहे. जलनेतिचा नियमित सराव केल्याने ध्यानाची गुणवत्ता देखील चांगली सुधारते. एमजीएम योग विभागाचे विभागप्रमुख गंगाप्रसाद खरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.