भारती विद्यापीठात Y20 युवा भारती २०२३ चे उदघाटन
Y20 हा G20 च्या अधिकृत गटांपैकी एक
पुणे दि. २१ : G20 ही सर्व वयोगटातील नागरिकांसाठी संकल्पना होती. Y20 ही १८ ते ३० वयोगटातील विद्यार्थ्यासाठी आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून मानसिक आरोग्य, सांस्कृतिक परंपरेची ओळख आणि पर्यावरणविषयक जागृतीसाठी देशभर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचाच भाग म्हणून भारती विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलात २१ व २२ नोव्हेंबर रोजी Y20 युवा भारती २०२३ या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी सुप्रसिद्ध वक्ते अवध ओझा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रसिद्ध ट्रायथलीट कौस्तुभ राडकर, Y20 चे अधिकारी आकाश झा, भारती विद्यापीठाचे रजिस्ट्रार जी. जयकुमार, आरोग्य विज्ञान विभागाच्या डॉ.अरुंधती पवार उपस्थित होते.
Y20 हे जगभरातील तरुणांसाठी जागतिक समस्यांशी संबंधित विचारप्रवर्तक संवादांमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच त्यावरच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी आणि बदलासाठी उत्सुक असलेल्याबरोबर अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी एक प्रख्यात व्यासपीठ आहे. या दोनदिवसीय कार्यक्रमात विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करणार असून भविष्यातील हिरवाईसाठी शाश्वत पद्धती, युवा सक्षमीकरण, मानसिक स्वास्थ्य या विषयांवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम व आरोग्य विज्ञान विभागाच्या संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दोनदिवशीय कार्यक्रमात अवध ओझा, डॉ. राजेंद्र जगताप, डॉ. रक्षा जाजू, आकाश झा, डॉ. मंदार सासणे, डॉ. ज्योती शेट्टी, ओम प्रियदर्शी छोटेरे, आर्या झा, रोहन मोरे, कौस्तुभ राडकर या प्रमुख वक्त्यांची व्याख्याने होणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी हेरिटेज वॉक, पक्षी निरीक्षण, महाराष्ट्राची लोकधारा व युवा जल्लोष या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुद्धीला चालना देणारे खेळ व यासारख्या विविध स्टॊलची मांडणी भारतीची विद्यार्थ्यानी केली आहे. देशभरातून सुमारे पाचशे युवकांनी यासाठी नोंदणी केली आहे त्यातील ४० परदेशी विद्यार्थी आहेत.