देवगिरी महाविद्यालयात फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमाला 2023 या व्याख्यानमालेचे उद्घाटन
गांधी, नेहरू आणि आंबेडकरांनी भारत देशाला निर्भय बनवले – डॉ. जयदेव डोळे
छत्रपती संभाजीनगर : गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्या संकल्पनेतील भारत समजून घ्यायचा असेल तर त्यांच्या साहित्याचा अभ्यास झाला पाहिजे. त्याच्या लेखनाची समीक्षा झाली पाहिजे. भारत देशाचा इतिहास हा गांधी, नेहरू आणि आंबेडकरांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी या देशाला जोडले आहे. या त्रयींनी आपले शिक्षण परदेशात पूर्ण करून भारत देशाच्या निर्मितीसाठी कार्य केले. या तिघांनी खरा भारत समजून घेतला. यातूनच भारताच्या निर्मितीची, विकासाची स्वप्न त्यांनी पाहिली. हे त्यांनी लिहिलेल्या हजारो पुस्तकातून आपल्या लक्षात येते. भारत देशाला निर्भय बनवण्याचे कार्य गांधी, नेहरू आणि आंबेडकरांनी केले. असे परखड मत डॉ. जयदेव डोळे यांनी व्यक्त केले.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय येथे फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमाला 2023 वर्ष 33 वे या व्याख्यानमालेचे उद्घाटन, पहिले पुष्प डॉ. जयदेव डोळे यांनी गुंफले. ‘गांधी, नेहरू आणि आंबेडकरांचा भारत’ या विषयावर ते बोलत होते. या पहिल्या पुष्पाचे अध्यक्ष राज्याचे माजी अर्थ राज्यमंत्री अनिल पटेल हे होते. पुढे बोलताना डॉ. जयदेव डोळे म्हणाले की, गांधी नेहरू आणि आंबेडकरांनी भारत देशाच्या निर्मितीमध्ये अत्यंत कष्ट आणि मेहनत घेतली. महात्मा गांधीजींनी देशाविषयी विचार मांडताना देशातील गोरगरीब लोकांमध्ये कोणताही भेदभाव करता कामा नये समता, न्याय, अन्याय विरुद्ध व शोषणाविरुद्ध आपला भारत निर्माण झाला पाहिजे अशी अपेक्षा महात्मा गांधीजींची असल्याचे त्यांनी सांगितले. गांधीजी अहिंसेचा भारत निर्माण करू पाहत होते त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहिंसेचा विचार स्वीकारला असे ते म्हणाले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्योग, कला, संस्कृती व कौशल्याधिष्ठीत व्यक्ती निर्माण करण्यातून देशाचे स्वप्न साकार केले. त्याचबरोबर भारताला आधुनिकतेकडे घेवून जाण्याची पाऊलवाट निर्माण केली. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा प्रभाव प्रदीर्घकाळ भारतीय चित्रपटसृष्टीवर आपल्याला पाहायला मिळतो असेही ते म्हणाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या निर्मितीच्या वेळी गांभीर्याने विचार करत ‘एक व्यक्ती एक मूल्य’ हा विचार भारताला दिला त्यात त्यांनी भारताची भविष्य पाहिले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाहीभिमूख कल्पना व्यापक स्वरूपाची होती. ते संसदीय लोकशाही निर्माण करू पाहत होते त्याचबरोबर भारताला ‘प्रजासत्ताक’ बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केले. गांधी ,नेहरू व आंबेडकरांनी नेहमीच समन्वयाची भूमिका घेतली होती.त्यांनी लोक विकासासाठी तडजोड केली.तिघांनी जन कल्याणासाठीचे कार्य केले. आजही त्यांच्याच विचारांची गरज आहे. अनिल पटेल यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात समकालीन राजकीय, सामाजिक परिस्थितीचा वेध घेऊन गांधी, नेहरु आणि आंबेडकर यांच्या विचारांची प्रासंगिकता अधोरेखित केली.
या व्याख्यानमालेची प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांनी केले. या व्याख्यानमालेचा हेतू त्यांनी सांगितला. तसेच ही व्याख्यानमाला मागील 32 वर्षापासून सातत्याने कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. महापुरुषांचे विचार बहुजन समाजापर्यंत पोहोचले पाहिजे हा उद्देश या व्याख्यानमालेचा आहे. या व्याख्यानमालेमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विचाराचे विचारवंत यांनी व्याख्यान दिल्याची माहिती ही त्यांनी प्रास्ताविकेमध्ये सांगितली. व्याख्यानमालेसाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ सदस्य त्रिंबक पाथ्रीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर व्याख्यानमालीचे समन्वयक डॉ. गणेश मोहिते, प्राचार्य डॉ. अनिल आर्दड, उपप्राचार्य डॉ. अपर्णा तावरे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विजय नलावडे, प्रा. सुरेश लिपाने, प्रा. नंदकुमार गायकवाड व महाविद्यालयातील प्राध्यापक, शहरातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय, सूत्रसंचालन व आभार समन्वयक डॉ. गणेश मोहिते यांनी केले.