उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिसंवादाचे उद्घाटन
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळे अंतर्गत शिक्षणशास्त्र विभागाद्वारे आधुनिक युगातील प्रगत शैक्षणिक प्रणालीसाठी आंतरविद्याशाखीय संदर्भावरील ‘इंटरडिसप्लीनरी कान्टेक्स्ट फॉर एज्युकेशनल सिस्टीम इन मॉडर्न इरा’ या राष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिसंवादाचे उद्घाटन प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे यांच्या हस्ते दि २१ मार्च रोजी करण्यात आले. यावेळी मंचावर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल डोंगरे, प्रा पी पी माहुलीकर, डॉ. राजेश खंबायत, एनआयटीटीटीआर भोपाल, डॉ. लक्ष्मण शिंदे, देवी अहिल्या विश्व विद्यालय इंदौर, डॉ. मनीषा इंदाणी, डॉ. संतोष खिराडे व इंजि. राजेश पाटील उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना प्र- कुलगुरू प्रा एस टी इंगळे म्हणाले की, विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० च्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठाने आजवर ६८ कार्यशाळांच्या माध्यमातून जवळपास १७ हजार विद्यार्थ्यांपर्यंत या नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती पोहचवली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० ची अंमलबजावणी करतांना निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आजच्या कार्यशाळेत सहभागींची मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न या परिसंवादाच्या माध्यमातून व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी अधिष्ठाता डॉ अनिल डोंगरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, समाजाचे जिवंत राहणे ही स्वयं नूतनीकरणाची प्रक्रिया आहे, त्यामुळे मानवी विकासाच्या दृष्टीने विचार करता विकासाच्या प्रत्येक घटकानुसार ही प्रक्रिया राबविली गेली पाहिजे. या परिसंवादाच्या बीजभाषणात प्रा. पी. पी. माहुलीकर यांनी संपूर्ण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० चा आढावा मांडला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. प्रिती सोनी यांनी केले तर आभार डॉ. लीना चौधरी यांनी मांडले.
दुपारच्या सत्रात डॉ राजेश खंबायत यांनी उच्च शिक्षणातील व्यावसायिकता आणि कौशल्य विकास या विषयावर व्याख्यान दिले. त्यानंतर डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी अध्ययन आणि अध्यापनातील आधुनिक नव प्रवाह आणि दृष्टीकोन या विषयावर मार्गदर्शन केले. या परिसंवादात १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तर ३० विद्यार्थ्यांनी संशोधन पेपर सादर केले.