सौ के एस के महाविद्यालयात नाटयकला शिबीराचे थाटात उद्घाटन
बीड : मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या. आजकालची मुले मोबाईलच्या आहारी गेलेले दिसतात. मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी पालक चिंतेत असतात, त्यासाठी बाल रंगभूमी परिषद, बीड आणि नाटयशास्त्र विभाग सौ के एस के महाविद्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने नाटयकला शिबीराचेआयोजन करण्यात आले. दि 23 एप्रिल 2024 रोजी डॉ दीपाताई क्षीरसागर, अध्यक्ष बालरंगभूमी शाखा बीड यांच्या हस्ते शिबीराचे थाटात उदघाटन झाले.
उदघाटन पर भाषणात त्या म्हणाल्या की, नाटक, संगीत, नृत्य, चित्रकला,यासर्व कला मानवाच्या जिवनातील अविभाज्य घटक आहे. मूल जन्मतःताच निरीक्षणाला सुरूवात करते. त्यातून विविध गोष्टी आत्मसात करते. हा त्याचा नाटयकलेचा पहिला धडा असतो. कलेमार्फत बालकांचा भावनिक विकास होतो तर क्रिडेमार्फत शारीरिक विकास होतो. पण आता दुर्देवाने आमच्या शालेय अभ्यासक्रमातून या बाबी काही दुर्लक्षित झालेल्या आहेत. शिवाय मोबाईलचे वेड लहानमुलाना या सर्वापासून दूर नेत आहे. त्यासाठी मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्याला वेगळे प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने बालरंगभूमी परिषद, बीड व नाटयशास्त्र विभाग यांच्या वतीने नाटयकला शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या समयी पालकांशीही वेगळा संवाद साधायचा विचार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणपर ते म्हणाले की, मुलांच्या विकासात पालकांची भूमिका अग्रण्य असते. मी खरच कौतुक करतो की, पालकांनी या शिबीरासाठी आपल्या पाल्यांना पाठवले. आजचे पालक जागरूक आहेत आणि ते आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहेत. असे बोलून त्यांनी आपल्या हार्दीक शुभेच्छा व्यकत केल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ दुष्यंता रामटेके यांनी शिबीराचा उद्देश आणि रूपरेषा सांगितली. नाटक, संगीत, नृत्य, चित्रकला या सर्व कलांची प्राथमिक माहिती दिली जाईल. याशिवाय मुलांकडून सादरीकरण ही करून घेतले जाईल. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर,पदव्युत्तर संचालक डॉ सतिश माऊलगे, कमवि उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, डॉ सुधाकर गुट्टे, डॉ विशंवाभर देशमाने, डॉ अनिता शिंदे, प्रा विजयकुमार राख, प्रा सुरेश थोरात, नामदेव साळूंके, प्रदिप मुळे तसेच बीड शहरातील कला रसिक, नागरीक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ दुष्यंता रामटेके यांनी मानले.