उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “लोकशाही सप्ताह”चे उद्घाटन
जळगाव : मतदानाच्या हक्काप्रती प्रत्येकाने जागरूक राहुन लोकशाही व निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. प्रामुख्याने देशातील युवकांनी जागरूकपणे मतदान करून लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन धरणगाव येथील तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागाच्या वतीने आयोजित “लोकशाही सप्ताह”च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सामाजिकशास्त्रे प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. अजय पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, रासेयोचे संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे आणि राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा. डॉ. उमेश गोगडिया यांची उपस्थिती होती.
यावेळी मतदान जागृतीपर सामुहिक प्रतिज्ञा घेण्यात आली, प्रतिज्ञेचे वाचन प्रा. डॉ. दिपक सोनवणे यांनी केले तसेच इव्हिएम मशीनचे प्रात्यक्षिक धरणगाव तहसील कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोईन शेख तर आभार प्रा. डॉ. विजय घोरपडे यांनी केले. यावेळी सामाजिकशास्त्रे प्रशाळेतील प्राध्यापक व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.