संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिपची हमी : मंत्री चंद्रकांत पाटलांचे आश्वासन
अभाविपच्या पाठपुराव्यानंतर उपोषणाची सांगता
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्या फेलोशिप वितरणातील अनियमिततेविरोधात सुरू असलेले संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी थकीत फेलोशिप तात्काळ देण्याचे, फेलोशिप विद्यार्थ्यांच्या नोंदणीच्या तारखेपासून सुरू करण्याचे आणि वितरणासाठी एकसमान धोरण आखण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण समाप्त केले. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत जुलै 2023 मधील जीआर (GR) सादर करून शासनादेश लागू करण्याचेही त्यांनी जाहीर केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधून तोडगा काढण्याची ग्वाही दिली. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून लवकरच मंत्रालय स्तरावर निर्णय घेण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.
या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पुणे महानगरमंत्री राधेय बाहेगव्हाणकर, सहमंत्री अलोक पवार, सई थोपटे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. सकारात्मक संवादानंतर संशोधक विद्यार्थी दयानंद पवार यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली.

