नागपूर विद्यापीठाच्या पदवीसह पदव्युत्तर पदवी प्रथम वर्ष प्रवेशास मुदतवाढ
५ सप्टेंबर २०२४ पर्यंत घेता येणार प्रथम सत्रात प्रवेश
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संलग्नित, संचालित महाविद्यालय तसेच पदव्युत्तर स्वायत्त शैक्षणिक विभागातील प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांना आता गुरुवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रवेश घेता येणार आहे.

शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी विद्यापीठाने संलग्नित, संचालित महाविद्यालयांकरीता १३ मे २०२४ रोजी शैक्षणिक वेळापत्रक अधिसूचना काढत घोषित केले होते. सदर शैक्षणिक वेळापत्रकानुसार प्रथम वर्ष प्रथम सत्र आणि वार्षिक अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या प्रवेशाची अंतिम तारीख ५ ऑगस्ट २०२४ ही होती. तर विद्यापीठाच्या स्वायत्त शैक्षणिक पदव्युत्तर विभागांकरिता शैक्षणिक वेळापत्रक अधिसूचना काढत २४ मे २०२४ रोजी घोषित केले. त्यानुसार पदव्युत्तर विभागात सत्र १ करिता प्रवेशाची अंतिम तारीख ५ ऑगस्ट २०२४ ही होती.
प्रवेशाची अंतिम तारीख संपुष्टात आल्यानंतर १३ ऑगस्ट २०२४ रोजी प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या आदेशानुसार २० ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या आदेशानुसार पुन्हा प्रवेश घेण्याच्या अंतिम तारखेस ५ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. असे विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ राजू हिवसे व विद्या विभागाचे उपकुलसचिव डॉ राजेंद्र ऊतखेडे यांनी कळविले आहे.