उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात रोजगार आणि व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या सहकार्याने भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रात रोजगार आणि व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा दि. २४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. कार्यशाळेस तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणुन नाबार्ड चे जळगाव जिल्हा अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात झांबरे म्हणाले की आजचा काळ कौशल्याचे काळ आहे म्हणुन विद्यार्थ्यांनी आपली पदवी संपादन करतांना एक तरी कौशल्य शिकुन घ्यावे त्याचा आपल्या भावी जीवनात कसा फायदा होईल हे ही महत्वाचे आहे. पुढे बोलतांना ते म्हणाले की आपल्या सभोवताली काय घडत आहे याची आपण जागरूकतेने नोंद घेतली पाहिजे जेणे करून त्याचा उपयोग आपल्याला सामाजिकच नव्हे तर करिअरच्या दृष्टीने सुध्दा उपयोग होऊ शकेल. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्रशाळेच्या संचालिका प्रा. मुक्ता महाजन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की यशस्वी होण्याच्या कुठलाच सोपा मार्ग नाही म्हणुन विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे कारण, मोठं होण्याची स्वप्नं पाहतांना वास्तविकतेचेही भान आपण ठेवले पाहिजे, यश लगेच मिळत नाही त्यासाठी मेहनत आणि जिद्द ठेऊन काळानुसार आपल्याला बदलावे लागते. यावेळी विद्यार्थ्यांनी रोजगाराशी निगडीत विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
या कार्यशाळेत प्रशाळेचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पाटील, प्रा. कृष्णा संदानशिव, डॉ. दीपक खरात, डॉ. सुदर्शन भावरे, प्रा. भारती सोनावणे, प्रा. मनीषा महाजन, प्रा. नेत्रा उपाध्ये, महेश सुर्यवंशी, भरत पालोदकर, दीपक बागुल, नितीन जाधन, चंद्रकांत बिऱ्हाडे, हेमंत पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. प्रतिभा गलवाडे यांनी केले तर आभार डॉ. प्रीती सोनी यांनी मानले.