डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणार
चार विद्याशाखेतील गुणवंतास ५१ हजारांचे रोख पारितोषिक
व्यवस्थापन परिषद सदस्य घेणार आर्थिक दायित्व
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने प्रत्येक विद्याशाखेतील गुणवंतास ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य यासाठी व्यक्तीगत रक्कम देणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली.
कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक शनिवारी (दि ०३) घेण्यात आली. या बैठकीस सदर प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या बैठकीस प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांच्यासह कुलपतीद्वारे नामनिर्देशित सदस्य डॉ गजानन सानप, काशिनाथ देवधर, डॉ भगवान साखळे, प्राचार्य डॉ भारत खंदारे, प्राचार्य डॉ गौतम पाटील, डॉ रविकिरण सावंत, डॉ अंकुश कदम, नितीन जाधव, अॅड दत्तात्रय भांगे, डॉ व्यंकट लांब, डॉ अपर्णा पाटील, डॉ संजय साळुंके, डॉ वैशाली खापर्डे, वित्त व लेखाधिकार सविता जंपावाड, परीक्षा मंडळ संचालक डॉ भारती गवळी आदी सदस्य उपस्थित होते.
बैठकीत मंजूर प्रस्ताव पुढीलप्रमाणे
१ . विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ०७ नोव्हेंबर २०२२ च्या मार्गदर्शक तत्वानुसार सद्यस्थितीत लागू असलेल्या पीएच डी अध्यादेश सुधारित करण्याबाबतचा प्रस्ताव संमत करण्यात आला.
२ . चारही विद्याशाखेतील विविध विषयातील पीएच डी नोंदणी केलेल्या ज्या संशोधक विद्याथ्र्यांची नोंदणी सन २०१५ व त्यापूर्वी नोवनोंदणी केलेल्या विद्याथ्र्यांची पुननोंदणीचा कालावधी तसेच त्यांचा कार्यकाल वाढवून मिळणेबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला – शैक्षणिक शुल्काव्यतिरिक्त रु १० हजार दंडासह दि ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी अंतिम प्रबंध सादर करण्याचा अटीवर तसेच यानंतर सदरील जुन्या संशोधक विद्यार्थ्यांची नोंदणी कोणत्याही कारणास्तव वाढवून देण्यात येऊ नये. या अटीवर चारही विद्याशाखेतील विविध विषयाचे पीएच डी नोंदणी केलेल्या ज्या संशोधक विद्याथ्र्यांची नोंदणी सन २०१५ व त्यापूर्वी नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची पुर्ननोंदणीचा कालावधी तसेच त्यांचा कार्यकाल वाढवून मिळण्याबाबतचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
३.. संचालक व्यवस्थापनशास्त्र विभागात एक्झिक्युटिव्ह एम बी ए इंडस्ट्रीएम्बेडेड हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षे २०२४-२५ पासून सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
४ . डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांद्वारे स्वखर्चातून चारही विद्याशाखेच्या प्रत्येकी एका विद्याथ्र्यांस गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली. एनेवेळचा हा ठराव कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी मांडला. विद्याशाखानिहाय गुणवंत विद्यार्थ्यांस रुपये ५१ हजार रुपये रक्कम, प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह असे प्रदान करण्यात येईल. गणुवंत विद्यार्थी पुरस्कारासाठी निष्कर्ष, स्वरुप निश्चित करण्यासाठी प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिष्ठाता यांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आली. विद्यापीठ नामविस्तार दिनी १४ जानेवारी २०२५ रोजी गुणवंताचा गौरव करण्यात येणार आहे.