एमजीएम विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीजचे उद्घाटन संपन्न
नेतृत्व करण्यासाठी त्याग करणे आवश्यक – कुलगुरू डॉ वांगचुक दोरजी नेगी
एमजीएममध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीजचे उद्घाटन संपन्न
छत्रपती संभाजीनगर : तथागत गौतम बौद्ध, महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर आदि महापुरुषांनी आपल्या व्यक्तिगत सुखाला त्यागून जगाच्या कल्याणासाठी आपले जीवन व्यतीत केले. या व्यक्तींमत्वांना आपल्या जीवनात प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याग करावा लागला असून आपल्याला नेतृत्व करायचे असेल तर त्याग करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर हायर तिबेटीयन स्टडीज वाराणसीचे कुलगुरू डॉ वांगचुक दोरजी नेगी यांनी यावेळी केले.



महात्मा गांधी मिशन विद्यापीठात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सकाळी ०९:३० वाजता विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात डॉ बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीजचे उद्घाटन सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर हायर तिबेटीयन स्टडीज वाराणसीचे कुलगुरू डॉ वांगचुक दोरजी नेगी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
उद्घाटन सोहळा झाल्यानंतर ‘बुद्धाज वे ऑफ लीडरशिप’ या विषयावर कुलगुरू डॉ वांगचुक दोरजी नेगी यांनी उद्घाटनपर भाषण केले तर एमजीएम राज्यशास्त्र विभागाचे प्रा डॉ एच एन सोनकांबळे यांचे ‘बौद्ध तत्त्वज्ञान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले.
यावेळी कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, नागरिक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
पुढे बोलताना कुलगुरू डॉ वांगचुक दोरजी नेगी म्हणाले, आपले वैयक्तिक सुख, शांती, यश हे म्हणजे जीवनाचा उद्देश नसून आपण किती लोकांचे कल्याण केले, किती लोकांना आनंदी केले, किती लोकांना सुखी केले यातून आपल्या जीवनाचा उद्देश प्रतीत होतो. देशामध्ये शिक्षणाची पहिली क्रांती तथागत गौतम बुद्ध यांनी केली आहे. समकालीन काळामध्ये विचार करीत असताना विद्यार्थ्यांशिवाय शिक्षकांचे काहीच अस्तित्व नाही. आपण आपल्या पाल्यांच्या जितका विचार करतो तितका विचार आपल्या विद्यार्थ्यांचा करीत असू तर आपण न्याय करीत आहोत अन्यथा, शिक्षक आणि पालक म्हणून आपला विकास कधीच होणार नाही.
कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी लिहिलेले ‘बुद्ध चरित्र’ वाचून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बुद्धांचा प्रभाव पडला. रक्ताचा एक थेंब ही न सांडता होणारी क्रांती त्यांना अपेक्षित होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना देशामध्ये राजकीय क्रांतीच्या अगोदर सामाजिक क्रांती अपेक्षित होती. सामाजिक क्रांतीचा विचार करीत असताना त्यांना बुद्ध तत्त्वज्ञानाचा एकच मार्ग आपल्यासमोर दिसत होता. देशाचे संविधान लिहित असताना समता, स्वांतत्र्य, बंधुभाव ही तत्वे आंबेडकरांनी बुद्ध तत्व ज्ञानातून स्वीकारली असल्याचे प्रा डॉ एच एन सोनकांबळे यांनी यावेळी सांगितले.
कुलपती अंकुशराव कदम यावेळी बोलताना म्हणाले, आज बुद्ध धम्माबद्दल जाणून घेण्याची वृत्ती प्रत्येक माणसात निर्माण झालेली आहे. विपसनामध्ये बुद्ध धम्माचे तत्वज्ञान आहे. शरीराने आणि मनाने कोणाला दुखवायचे नाही, आपण सुख द्यायचे आणि आपल्या मनामध्ये सतत चांगल्या गोष्टींची पेरणी करायची हे तत्वज्ञान धम्माचे आहे. आणि हेच तत्वज्ञान सर्वच धर्माचे आहे. एमजीएम विद्यापीठात बुद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास व्हावा, हा विचार समोर ठेऊन आज हे बुद्धिस्ट स्टडी सेंटर सुरु होत आहे, याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
बुद्धांचे तत्वज्ञान आपल्याला यशस्वी जीवन जगण्यासाठी मार्ग दाखवते. बुद्ध धर्माचे तत्वज्ञान विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आम्ही सहभागी केले असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह त्यांना नैतिकदृष्ट्या प्रमाणिक आणि जबाबदार नागरिक बनवते. आज उद्घाटन झालेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीज केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असलेल्या संपूर्ण विकास, इतिहास व भारतीय संस्कृती या बाबींचा अभ्यास केला जाणार असल्याचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी यावेळी सांगितले.
आज झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शहनाज बासमेह यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई यांनी केले तर आभार अधिष्ठाता डॉ रेखा शेळके यांनी मानले.