गरजूंसाठी चादरींचे वाटप; डॉ जे जे मगदुम फार्मसी कॉलेजचा प्रेरणादायी उपक्रम
जयसिंगपूर : समाजासाठी योगदान देण्याच्या आपल्या बांधिलकीतून डॉ जे जे मगदुम फार्मसी कॉलेज जयसिंगपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युनिटतर्फे थंडीच्या दिवसांत गरजू व्यक्तींना मदतीचा हात पुढे करत जयसिंगपूर आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 100 गरजू नागरिकांना चादरी (ब्लॅकेट) चे वाटप करण्यात आले.
उपक्रमासाठी एनएसएस स्वयंसेवकांनी परिसरातील गरजू नागरिकांची ओळख करून त्यांना थंडीच्या कठीण काळात दिलासा मिळवून देण्यासाठी चादरींचे वितरण केले. विद्यार्थ्यांनी समाजसेवेच्या या कार्यात विशेष उत्साह दाखवला. कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शितलकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत म्हणाले, “राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना रुजते. गरजू व्यक्तींना दिलासा देणारे हे काम कौतुकास्पद आहे. समाजसेवेचा हा उपक्रम भविष्यातही सुरु राहावा, अशी अपेक्षा आहे.

डॉ जे जे मगदुम ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदुम आणि वाइस चेअरपर्सन अॅडव्होकेट डॉ सोनाली मगदुम यांनी या उपक्रमाचे कौतुक करत एनएसएस युनिटला शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी या प्रकारच्या सामाजिक कार्यात सहभागी होणे ही केवळ एनएसएस युनिटचीच नव्हे, तर महाविद्यालयाचीही प्रतिष्ठा वाढवणारी बाब आहे. आम्हाला अभिमान आहे की महाविद्यालयाचे एनएसएस युनिट समाजसेवेचा आदर्श निर्माण करत आहे.” हा उपक्रम परिसरात सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले असून, गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा संदेश इतरांनाही प्रेरणा देणारा ठरला आहे.
एनएसएस युनिटच्या या सामाजिक बांधिलकीमुळे महाविद्यालयाच्या सामाजिक योगदानाला आणखी बळ मिळाले आहे. या उपक्रमाचे आयोजन एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा प्रणिल तोरसकर व विद्यार्थी प्रतिनिधि सात्विक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शितलकुमार पाटील, शैक्षणिक समन्वयक डॉ सतीश किलजे, प्रा रामलिंग माळी, प्रा शुभम पाटील, प्रा प्रतीक उगारे, प्रा सौरभ समडोळे तसेच केदार खाडे, कुमार शिंदे, आदित्य मेंडेगिरी, धनंजय नरके, प्रथमेश जाधव, पार्थ काळबिरे, यश पाटील, जीशान मनेर, पार्थ काळबिरे ह्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.