राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे ‘मिशन युवा’ कार्यक्रमात योगदान
-जिल्ह्यात किमान ७५ हजार नवमतदारांच्या नोंदणीचे उद्दिष्ट
नागपूर : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील किमान ७५ हजार नवमतदारांच्या नोंदणीसाठी ‘मिशन युवा’ हे अभियान राबविण्यात येत आहेत. या अभियानाचे उद्घाटन मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात शनिवार, दिनांक १५ जुलै २०२४ रोजी करण्यात आले. प्रशासनाकडून राबविल्या जात असलेल्या मिशन युवा कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे देखील योगदान असल्याचे प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी सांगितले.
राज्यातील एकूण लोकसंख्येत १८ आणि १९ वर्षे वयोगटातील युवकांचे प्रमाण ५.८ टक्के आहे. मतदार यादीत मात्र हे प्रमाण प्रतिबिंबित होत नाही. हे प्रमाण केवळ ०.६८ (पॉईंट अडूसष्ट) टक्के आहे. १८ आणि १९ वर्षाच्या युवकांच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण केवळ १५ टक्के आहे. नवमतदारांनी कर्तव्यांची जाणीव ठेवत मतदार म्हणून नावनोंदणी करीत मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाहीतील सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले. यावेळी ते उदघाटनपर भाषणात बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॅा. संजय दुधे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, ज्योती आमगे यांच्यासह दिव्यांग आणि तृतीयपंथीयांचे प्रतिनिधी, महसूल यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी-विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते.
देशाचा स्वातंत्र्योत्तर कालखंड पाहिला असता अनेक आव्हाने ही लोकशाहीमध्ये निर्माण झाली. ही आव्हाने मतदारांनी समर्थपणे परतवली. मतदारांची शक्ती हीच खरी लोकशाहीला तारू शकते, हेच पुनः पुन्हा या देशाने दाखवून दिले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या निवडणुका घेण्यात आल्या त्यावेळी अनेक राजकीय पंडितांनी भारताची लोकशाही ही फार दिवस टिकणार नाही, ती कधीही कोलमडून पडेल, अशी भाकिते केली होती. मात्र,आजही आपली लोकशाही जगासाठी आदर्श आणि चैतन्यदायी आहे, हे सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे श्री. देशपांडे यावेळी म्हणाले.
सामाजिक उत्तरदायित्व, सकारात्मक दृष्टिकोन आणि कामाप्रती समर्पण भाव ही युवकांची खरी संपत्ती आहे. यातील मतदार म्हणून नावनोंदणी करणे व मतदानाचा हक्क बजावणे हा सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग आहे. लोकशाही आपली वाटावी यासाठी यात लोकसहभाग आणि सर्वसमावेशकता आवश्यक आहे. लोकशाही व्यवस्था ही आपली वाटली पाहिजे. माझे प्रश्न ही संस्था, प्रणाली सोडवू शकते असा विश्वास निर्माण होणे गरजेचे आहे.सर्वसमावेशकता हे लोकशाहीचे तत्व आहे. मुख्य प्रवाहातील मतदारांव्यतिरिक्त वंचित मतदारही या प्रक्रियेत मतदार म्हणून सहभागी होणे आवश्यक आहे. महिला, दिव्यांग, तृतीयपंथी हे घटक या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे.
विद्यापीठाचा सहभाग – डॉ. संजय दुधे
जिल्ह्यात किमान ७५ हजार नवमतदारांच्या नोंदणीसाठी मिशन युवा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची समर्थपणे साथ लाभणार असल्याचे प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी सांगितले. मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे, अभियानाची ब्रँड अँबेसिडर ज्योती आमगे यांच्यासोबत देखील प्र-कुलगुरु डॉ. दुधे यांनी संवाद साधला.
मिशन युवा, नागपूरचा उपक्रम – जिल्हाधिकारी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले. जिल्हाधिका-यांनी पॅावर पॅाईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मिशन युवा या उपक्रमाची माहिती दिली. महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्याने हा अभिनव वेगळा प्रयोग केला असून काल मर्यादेत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे ठरवले आहे. येत्या तीन महिन्यात जिल्ह्यातील किमान ७५ हजार मतदारांची नोंदणी करणे हे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात १८ आणि १९ वर्षे वयोगटातील नावनोंदणीचे प्रमाण अत्यल्प आहे. यासाठी महाविद्यालयीन स्तरावर दोन विद्यार्थ्यांची युवा ॲम्बिसिडर म्हणून नियुक्ती केली जाईल. यासाठी महाविद्यालयांचे सहकार्य घेतले जाईल. स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ विविध निवडणूक विषयक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी यावेळी दिली.
तत्पूर्वी, मिशन युवा मतदार नोंदणी स्टॅाल्सचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यानंतर स्टॅाल्सची पाहणी करीत बीएलओंशी संवाद साधला. मिशन युवा अंतर्गत जिम्नॅस्टिक, मल्लखांब या खेळांचे सादरीकरणही मान्यवरांसमोर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी केले तर आभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी मानले.
केवळ बाता नको, मतदान करा – विभागीय आयुक्त
लोकशाहीतील मतदान हा सर्वात मोठा उत्सव आहे. या उत्सवात सर्वच मतदारांनी उत्साहाने सहभागी होण्याची गरज आहे. विविध राजकीय विषयांवर आजचा युवा वर्ग चर्चा करताना दिसतो. मात्र, मतदान प्रक्रियेत सहभागी होत नाही. त्यामुळे या प्रकियेत सहभागी होत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी यावेळी केले.