मुक्त विद्यापीठात ‘दिव्यांगाप्रती सुगम्यता’या विषयावर व्याख्यान संपन्न
दिव्यांगाना विविध स्तरावर प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे – धनंजय भोळे
नाशिक : भारत सरकार द्वारा दिव्यांग सशक्तीकरण विभागाअंतर्गत दि 3 डिसेंबर 2015 पासून सुगम्य भारत अभियान सुरु करण्यात आलेले आहे. तसेच दरवर्षी मे महिन्यातील तिसरा गुरुवार वैश्विक सुगम्य जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेअंतर्गत कार्यान्वित असलेले दिव्यांग अध्ययन केंद्रामार्फत गुरूवार, दिनांक 16 मे 2024 रोजी दुपारी 3:00 वाजता विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात ‘दिव्यांगाप्रती सुगम्यता’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिव्यांग अध्ययन केंद्र आणि समावेशित शिक्षण या विभागातील समन्वयक धनंजय भोळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तथा संचालक प्रा जयदिप निकम हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालक प्रा संजीवनी महाले, शैक्षणिक संयोजक डॉ साधना तांदळे, शिवानंद कहाळेक, ज्ञानेश्वर जाधव उपस्थीत होते.
सुगम्य भारत अभियान अंतर्गत सर्वांसाठी सुलभ भौतिक वातावरण निर्माण करणे, दिव्यांगांसाठी अनुकूल इमारती, मानव संसाधन, वाहतूक वाहने, स्थानके, पूर्णपणे अनुकूल केली जातील अशी ध्येये लक्षात ठेवून हे अभियान कार्य करत आहे. त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरण (२०२०) नुसार सर्व विद्यार्थ्यांना मुख्यप्रवाहात सामावून घेण्यासाठी शिक्षकांना याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे या उद्देश्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या व्याख्यानातून विद्यापीठाअंतर्गत कार्यान्वित अभ्यासकेंद्रावरील प्रवेशित विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना, शिक्षकांना, तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिव्यांगासाठी सुगम्यता आणण्यासाठी वापरली जाणारी नवनवीन तंत्रसामग्री, साधन, सॉफ्टवेअर तसेच दिव्यांगाना उपयोगी असणारे समावेशित तंत्रज्ञानावर आधारित माहिती धनंजय भोळे यांनी उपस्थितांसमोर मांडली. याप्रसंगी त्यांनी उपस्थित श्रोत्यांना दिव्यांगांसाठी मोबाईलवर उपलब्ध असलेल्या काही तंत्राज्ञानाचे प्रात्याक्षिके करून दाखविली.
भोळे यांनी पुढे सांगितले की, दिव्यांगांना विविध सरकारी तसेच खाजगी संस्था, मंडळ यावर प्रतिनिधित्व देणे गरजेचे आहे. त्यामुळे दिव्यांग तेथे आपल्या काय काय अडचणी असता हे सूचवू शकतात, यामुळे त्या अडचणींचे निरसर करणे शासन, तसेच इतर संस्थांना सोपे जाईल. सर्वप्रकारच्या दिव्यांगांना शिक्षणात, नोकरीत तसेच इतर क्षेत्रात समान संधी देणे गरजेचे आहे, असेही ते म्हंटले. दिव्यांगासमोर अनेक आवाहने आहे, याबाबत त्यांनी उपस्थितांसमोर माहिती दिली आणि त्यात बदल करणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.
भोळे हे स्वत: अल्पदृष्टी असल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेतांना त्यांना आलेले अनुभव, तसेच काही गंमतीदार किस्से देखील त्यांनी उपस्थितांना सांगितले. विद्यापीठाने पुढाकार घेऊन दिव्यांगासाठी विविध शिक्षणक्रम तसेच त्यासंबंधीच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर शिक्षणापासून वंचित अनेक दिव्यांगांना त्याचा उपयोग होईल असेही त्यांनी सांगितले.
बरेच दिव्यांग उद्योग क्षेत्रात यशस्वी झालेले आहे, त्यामुळे एकप्रकारे राष्ट उभारणीसाठी दिव्यांग देखील काम करत आहे, असे देखील त्यांनी नमूद केले. याप्रसंगी त्यांनी काही यशस्वी दिव्यांग उद्योजकांची उदाहरणे देखील दिली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ जयदीप निकम म्हणाले की, विद्यापीठाने तसेच इतर शैक्षणिक संस्थांनी दिव्यांगांना सुगम्यता देवून चांगले शिक्षण दिले पाहिजे. तसेच भोळे यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा लक्षात ठेवून पाऊले उचलावी. हे व्याख्यान प्रत्येकांसाठी डोळ्यात अंजन घातल्याप्रमाणे आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा संजीवनी महाले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ साधना तांदळे यांनी केले, तर आभार शैक्षणिक संयोजक शिवानंद कहाळेकर यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांचे संचालक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संयोजक तसेच विद्यापीठाच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर काही श्रोते उपस्थित होते.