शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ विलास शिंदे मराठी विज्ञान परिषदेच्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे मानकरी

लेखनशिस्त व वेळेचे व्यवस्थापन ही डॉ विलास शिंदे यांची वैशिष्ट्ये – कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के

मराठी विज्ञान परिषदेच्या सुधाकर आठले पुरस्काराबद्दल प्रशासनातर्फे गौरव

कोल्हापूर : लेखनाची शिस्त आणि वेळेचे व्यवस्थापन या वैशिष्ट्यांच्या बळावरच शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव तथा विज्ञानलेखक डॉ विलास शिंदे यांना लेखनसातत्य टिकविणे शक्य झाले. त्यामुळेच मराठी विज्ञान परिषदेच्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे ते मानकरी ठरले, असे गौरवद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी काल येथे काढले.

मराठी विज्ञान परिषदेचा सुधाकर आठले पुरस्कार मिळाल्याबद्दल कुलसचिव डॉ विलास शिंदे यांचा शिवाजी विद्यापीठ प्रशासनातर्फे गौरव करताना कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के. 

मराठी विज्ञान परिषदेतर्फे समाजात विज्ञान प्रसार तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याकरिता किमान दहा वर्षे विविध प्रकारे कार्य करणाऱ्या, पण ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीला सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार देऊन गौरविले जाते. सन २०२४साठीचा हा पुरस्कार डॉ विलास शिंदे यांना नुकताच मुंबई येथे परिषदेच्या ५८व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रदान करण्यात आला. त्या निमित्ताने आज विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलगुरू डॉ शिर्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ग्रंथभेट देऊन डॉ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

Advertisement

कुलगुरू डॉ शिर्के म्हणाले, डॉ विलास शिंदे यांची कार्यनिष्ठा कौतुकास्पद आहे. जबाबदारीचे कार्यालयीन प्रशासकीय कामकाज सांभाळून त्यापलिकडे व्यक्तीगत वेळ लेखनासाठी काढणे हे फार कष्टाचे आहे. त्यामधील सातत्य सांभाळणे ही तर फारच जिकीरीची बाब असते. मात्र, डॉ शिंदे यांनी त्या संदर्भात जोपासलेले सातत्य महत्त्वाचे आणि सर्वांसाठीच आदर्शवत स्वरुपाचे आहे.

प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील म्हणाले, डॉ शिंदे यांच्यावर प्रशासनातल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या. त्या यशस्वीरित्या सांभाळत असताना त्याच्या बरोबरीने आपले विज्ञानलेखनावरील प्रेम त्यांनी सांभाळले. लेखनातील नियमितता आणि ताज्या विषयांच्या अनुषंगाने संदर्भ संशोधन आणि सर्वसामान्य लोकांना समजेल अशा सोप्या शब्दांत त्यांचे विश्लेषण करण्याची हातोटी त्यांना साधलेली आहे. हे समाज प्रबोधनाचे काम त्यांनी या पुढेही चालू ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ श्रीकृष्ण महाजन यांनी डॉ शिंदे यांची सर्जनशीलता वाखाणण्याजी असल्याचे सांगितले. यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ आलोक जत्राटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपकुलसचिव गजानन पळसे यांनी केले. यावेळी विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारी डॉ सुहासिनी पाटील, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ महादेव देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ सरिता ठकार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page