राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाच्या संग्रहालयाचे भूमिपूजन
लवकरच साकारणार दुर्मिळ वस्तूंचे संग्रहालय
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्त्व विभागात असलेल्या दुर्मिळ वस्तूंचे संग्रहालय लवकरच साकारले जाणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात विभागाच्या बाजूला नवीन संग्रहालयाचे भूमिपूजन प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या शुभहस्ते गुरुवार, दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी पार पडले.
![](https://campuskatta.com/wp-content/uploads/2025/01/Groundbreaking-ceremony-of-the-Museum-of-the-Department-of-Archaeology-Nagpur-University-1024x576.jpeg)
यावेळी कार्यक्रमाला प्रभारी प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व विभाग प्रमुख डॉ प्रबास साहू, विभागातील शिक्षक डॉ प्रियदर्शी खोब्रागडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जी एस कोळी, विद्यापीठ अभियंता विनोद इलमे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस जी कुलकर्णी, कंत्राटदार द्वारका मंगलानी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्त्व विभागात सद्यस्थितीत असलेले संग्रहालय केवळ शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. या संग्रहालयामध्ये विभागाच्या वतीने विदर्भातील विविध ठिकाणी पवनार, मांढळ, दत्तवाडी, चंदनखेडा, केळझर, टाकळघाट, खापा, गंगापूर, आर्णी, दवलामेटी, सावरी- पवनी, मंसर, भाताळा, माहूरझरी, थारसा, गवाराला, भोकरदन, द्रुगधामणा, उबळी आदी विविध ठिकाणी करण्यात आलेले शोध आणि उत्खननातून प्राप्त विविध प्रकारचे जीवाश्म, दगडी अवजारे, टेराकोटा कला, बांगड्या, पेंडेंट, कानातले, अंगठ्या, घोड्याचे दागिने, शिल्प अशा विविध वस्तूंचा यामध्ये समावेश आहे.
शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने येथील संस्कृतीची ओळख संपूर्ण जगाला व्हावी संग्रहालय निर्मितीकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून लवकरच या संग्रहालयाचे बांधकाम पूर्णत्वास येईल.