सोलापूर विद्यापीठाच्या 298 कोटी 24 लाख 86 हजारांच्या अंदाजपत्रकास अधिसभेची मंजुरी

विद्यार्थी विकास व संशोधनासाठी भरीव तरतूद

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या अंदाजपत्रकात 248 कोटी 43 लाख 36 हजार रुपये इतकी अपेक्षित रक्कम जमा गृहीत धरून 298 कोटी 24 लाख 86 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास अधिसभेने एकमताने दुरुस्तीसह मंजुरी दिली. या अंदाजपत्रकात 49 कोटी 81 लाख 50 हजार रुपये इतकी तूट दर्शविण्यात आली आहे. विद्यार्थी विकास आणि संशोधनासाठी या अंदाजपत्रकात भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे.

सोलापूर विद्यापीठ

बुधवारी, विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक पार पडली. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्यासह अधिसभेचे सदस्य उपस्थित होते. या सभेचे सचिव म्हणून कुलसचिव योगिनी घारे यांनी काम पाहिले. या बैठकीत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी अंदाजपत्रक सादर केले.

विद्यापीठाच्या या अंदाजपत्रकाची प्रामुख्याने पाच टप्प्यांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. देखभाल दुरुस्ती, वेतन, ऋण आणि अनामत, विकास योजना भाग एक- शासन अनुदान तसेच विकास योजना भाग दोन- विद्यापीठ निधी अशा पाच टप्प्यांमध्ये अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यंदाच्या अंदाजपत्रकात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तसेच संशोधन कार्य, विविध उपक्रम राबविण्यासाठी निधीची भरीव तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर अधिसभा सदस्यांनी चर्चा करून दुरुस्तीसह अंदाजपत्रकाला एकमतानी मंजुरी दिली.

अधिसभेच्या बैठकीत सुरुवातीला मागील इतीवृत्तांत वाचून कायम करण्यात आला. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पार पडला. अंदाजपत्रकाच्या सादरीकरणानंतर सदस्यांनी काही ठराव मांडले. ठरावावर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले.

अंदाजपत्रकातील ठळक मुद्दे

Advertisement
  • शिक्षकांच्या संशोधनास चालना मिळण्यासाठी सीड मनी संशोधन उपक्रमाकरिता 35 लाख रुपयांची भरीव तरतूद.
  • मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढवण्यासाठी मुली शिकवा, समाज घडवा उपक्रमाकरिता 5 लाख रुपयांची विशेष तरतूद.
  • कमवा व शिका योजनेसाठी 12 लाख 50 हजार रुपयांची तरतूद.
  • विद्यापीठातील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेसाठी 20 लाख रुपयांची तरतूद.
  • मराठी भाषा गौरव दिनाकरिता 8 लाख रुपयांची तरतूद.
  • विद्यापीठातील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळा व परिसंवादासाठी 10 लाख रुपयांची तरतूद.
  • विद्यार्थ्यांच्या संशोधन शिष्यवृत्ती योजना आणि विद्यापीठ परिसरातील गरीब 40 विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके भेट उपक्रमासाठी भरीव तरतूद.
  • विद्यापीठ आयएसओ मानांकनासाठी 5 लाख रुपयांची तरतूद.
  • इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजेसकरिता विद्यापीठ हिस्सा म्हणून 50 लाख रुपयांची विशेष तरतूद.
  • प्रस्तुत विद्यापीठ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान घटक महाविद्यालय सुरू करण्याकरिता विशेष तरतूद.
  • वृक्ष संवर्धनासाठी शासन मार्गदर्शनानुसार 1.20 कोटी रुपयांची तरतूद.
  • ग्रंथालय विकास निधीकरिता 7 लाख रुपयांची तरतूद.
  • शास्त्रीय उपकरण केंद्रासाठी 3 कोटी रुपयांची तरतूद.
  • परीक्षा विभाग अंतर्गत इन्फ्रास्ट्रक्चर व विविध कामाकरिता 5 कोटीची तरतूद
  • विद्यार्थी विकास यासाठी नाविन्यपूर्ण योजना व तरतुदी अंदाजपत्रकात झाल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या खर्चासाठी प्रत्येकी 30 लाख रुपयांची तरतूद!
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या दि. 6 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या बैठकीतील शिफारशीनुसार विद्यापीठामध्ये नव्याने तीन अध्यासन केंद्रास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सन 2024-25 च्या अंदाजपत्रकामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र आणि छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या खर्चासाठी प्रत्येकी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात नव्याने तिन्ही अध्यासन केंद्र विद्यापीठात सुरू होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page