अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांची तपोवन संस्थेला भेट
दाजीसाहेब पटवर्धन यांचे कार्य समाज विकासाचा दीपस्तंभ – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते
अमरावती : पद्मश्री डॉ शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांचे कार्य समाज विकासाचा दीपस्तंभ आहे. कुष्ठ रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. 1950 साली कुष्ठ रोग्यांसाठी विदर्भ महारोगी सेवा मंडळाची तपोवनमध्ये स्थापना केली. त्यांच्या कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, असे मनोगत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी व्यक्त केले. विद्यापीठ शेजारी असलेल्या तपोवन संस्थेला कुलगुरूंनी स्वत:हून भेट दिली. भेटीप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुभाष गवई, सचिव सहदेव गोडे, सहसचिव ऋषिकेश देशपांडे, विश्वस्त झुबिन धोतीवाला, विवेक मराठे, आश्विन आळशी, विद्याताई देसाई, भिमराव ठावरे, जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर आदी उपस्थित होते.
दाजीसाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या विदर्भ महारोगी सेवा मंडळ संस्थेला 75 वर्षे पूर्ण झाली असून आजही या संस्थेचे कार्य निरंतरपणे सुरु आहे. याप्रसंगी प्राचार्य डॉ सुभाष गवई यांनी दाजीसाहेब व माईसाहेब पटवर्धन यांची राहण्याची खोली तसेच दाजीसाहेब यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली. यावेळी कुलगुरूंनी दाजीसाहेबांच्या दुर्मिळ फोटोरूपी गॅलरीची पाहणी करुन दाजीसाहेबांच्या कार्याची माहिती जाणून घेतली.
पद्मश्री डॉ शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब यांना केंद्र सरकारने 1955 मध्ये कुष्ठ निर्मूलनाच्या कार्यासाठी दिलेली गाडी, दाजीसाहेब वापरत असलेली टांगागाडी, रिंगी तसेच परिसरातील हातमागाद्वारे तयार झालेले वस्त्र, कापड, सतरंजी याशिवाय परिसरातीलच लोखंडी कपाट बनविण्याचा आणि लाकडी सागवान फर्निचर बनविण्याचा कारखाना, स्वयंपाक घर, गौशाळा, साहित्य विक्री भांडार याची पाहणी करुन तेथे कारागीर करीत असलेल्या कामाचे कुलगुरूंनी कौतुक केले.
तपोवन संस्थेचा 388 एकराचा परिसर असल्याची माहिती डॉ गवई यांनी दिली. पुढे त्यांनी सांगितले, दाजी साहेबांनी आजवर अनेक कुष्ठ रुग्णांना उपचाराबरोबरच व्यवसाय शिक्षणाचे धडे देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनविले. हजारो अनाथ, निराधार आणि आदिवासी मुलामुलींचे पलकत्व स्वीकारुन त्यांना लहान्याचे मोठे करुन स्वत:च्या पायावर उभे केले. दाजी साहेबांच्या कार्याचा सन्मान म्हणून केंद्र शासनाने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. या संस्थेत दररोज चारशे लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते. परिसरात दवाखाणा, शाळा, पोस्ट ऑफिस आदींची व्यवस्था केली आहे. याप्रसंगी परिसरातील निसर्गरम्य गार्डनची कुलगुरूंनी पाहणी केली. दाजीसाहेबांनी त्याकाळी उभारलेले शिवालय, श्रीराम मूर्ती तसेच स्वातंत्र्य संग्रामातील शहीद योद्धांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधलेल्या स्मारकाची पाहणी करुन ते भारावून गेले.
यावेळी तपोवन परिसरामध्ये कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी परिसरात राहणाया वयोवृद्ध स्त्रिया, युवक यांचेशी कुलगुरूंनी संवाद साधला. तपोवन संस्थेला सर्वांनी विशेषत: विद्यार्थ्यांनी भेट द्यावी आणि दाजीसाहेबांनी समाजासाठी विशेषत: कुष्ठ रोग्यांसाठी केलेल्या कार्याची पाहणी करावे, असे आवाहन कुलगुरूंनी केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुभाष गवई यांनी कुलगुरूंचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुस्तक देवून संस्थेतर्फे सन्मान केला तसेच जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांचे सुद्धा स्वागत केले. तपोवन संस्थेला अनेक दानदात्यांनी देणगी दिलेली आहे. आणखी मोठ्या प्रमाणावर देणी संस्थेच्या विकासासाठी आवश्यक असून देणगी देण्यासाठी दानदात्यांनी पुढे यावे अशा भावना अध्यक्ष डॉ सुभाष गवई यांनी व्यक्त केल्यात.