अमरावती विद्यापीठात डॉ श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न

ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार म्हणजे ज्ञानपिपासू व्यक्तिमत्व – डॉ पंकज चांदे

जयंतीनिमित्त विद्यापीठातील डॉ श्रीकांत जिचकार स्मृति संशोधन केंद्र येथे व्याख्यान संपन्न

अमरावती : ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार म्हणजे ज्ञानपिपासू व्यक्तिमत्व होतं, त्यांच्या ज्ञानाच्या क्षेत्राला कुठल्याही मर्यादा नाहीत, असे ते ज्ञानी होते, असे प्रतिपादन कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ पंकज चांदे यांनी केले. ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्ताने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्राच्याच्यावतीने ‘डॉ श्रीकांत जिचकार : एक आगळं व्यक्तिमत्व’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री डॉ सुनिल देशमुख, प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, डॉ श्रीकांत जिचकार स्मृति संशोधन केंद्राचे संचालक डॉ संदीप जोशी उपस्थित होते.

डॉ चांदे पुढे म्हणाले, सर्वाधिक पदवी प्राप्त करणारा व्यक्ती म्हणून डॉ श्रीकांत जिचकार हे जगातील एकमेव असे व्यक्तिमत्व आहे. ज्योतिष्यशास्त्रात ते एवढे निपूण होते, की स्वत:च्या आयुष्याबाबतही त्यांना अवगत होते. त्यांनी केलेली भाकिते अगदी तंतोतंत खरी ठरली आहेत. दिल्ली येथे भरलेल्या पुस्तक प्रदर्शनीमधील उदाहरण सांगतांना डॉ चांदे म्हणाले, डॉ श्रीकांत जिचकार यांनी पुस्तक प्रदर्शनीतून दिडशे पुस्तके विकत घेतली व सर्वच्या सर्व त्यांनी वाचलीत. आफ्रिकेमधील डरबन येथे झालेल्या जागतिक धार्मिक परिषदेतही त्यांनी भाषण दिले होते. एकूणच सगळ्याच क्षेत्रात ते ज्ञानवंत होते, असेही डॉ चांदे म्हणाले. ज्ञान मिळविल्यानंतर त्याचा डॉ श्रीकांत जिचकार यांनी खरं बोलणे, कर्तव्य आणि ज्ञानदान असे उपयोग करा, असा सल्ला त्यांनी दिला. दयानंद सरस्वती हे त्यांचे गुरु होते व डॉ श्रीकांत जिचकार यांच्या निधनानंतर दयानंद सरस्वती यांनी डॉ श्रीकांत जिचकार पुन्हा येतील, असे भाष्य केले होते. असेही डॉ चांदे यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

डॉ श्रीकांत जिचकार यांच्यामुळेच मी घडलो – डॉ सुनिल देशमुख

प्रमुख अतिथी डॉ सुनिल देशमुख म्हणाले, डॉ श्रीकांत जिचकार यांच्यामुळेच मी घडलो. डॉ श्रीकांत जिचकार यांनी नऊ विषयात एम ए केले होते व सर्वच विषयामध्ये ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत. जगातील सर्व विषयाचं ज्ञान त्यांना होतं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती कायम स्मरणात रहाव्यात, यादृष्टीने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी प्रयत्न केलेत व त्यात अखेर यश आले. आशियातील सर्वाधिक उच्चशिक्षित व्यक्ती म्हणून त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे, असे डॉ देशमुख म्हणाले.

परिसासारखं डॉ श्रीकांत जिचकार यांचं व्यक्तिमत्व – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते

अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू डॉ मिलींद बारहाते म्हणाले, परिसाला स्पर्श झाला की, त्याचे जसे सोने होते, तसे डॉ श्रीकांत जिचकार यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या जो कोणी संपर्कात आला, त्यांचे भविष्य उज्ज्वल झाले. अतिशय कठीण विषय ते अगदी सोप्या भाषेत उपस्थितांना सांगायचे. त्यांची विधानसभा, संसदेमधील भाषणे आपण संकलित करुन त्याचे पुस्तकरुपाने प्रकाशन करू असा विश्वासही यावेळी कुलगुरू डॉ बारहाते यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर स्मृति संशोधन केंद्राच्या विकासासाठी जे जे करता येईल ते करू असेही ते म्हणाले.

संत गाडगे बाबा व डॉ श्रीकांत जिचकार यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक डॉ वैभव म्हस्के यांनी केले. सूत्रसंचालन डॉ अंबादास घुले यांनी, तर आभार स्मृति केंद्राचे संचालक डॉ संदीप जोशी यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

व्याख्यान कार्यक्रमाला डॉ व्ही टी इंगोले, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ निलेश कडू, आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर, व्य प सदस्य डॉ व्ही एम मेटकर, व्य प सदस्य डॉ नितीन चांगोले, माजी महापौर मिलींद चिमोटे, श्री संत गाडगे बाबा अध्यासन केंद्रप्रमुख डॉ दिलीप काळे, डॉ प्रशांत ठाकरे तसेच विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page