तलाठी भरती परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवून द्या आणि शुल्क कमी करा – एसएफआय
निवेदनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल मात्र १ दिवसच मुदतवाढ, किमान ७ दिवस वाढून द्यावे अशी संघटनेची मागणी
बीड : रिक्त तलाठी पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज करणे सुरु आहे. दिनांक १७ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती मात्र एसएफआयने मुख्यमंत्र्यांना ईमेल द्वारे निवेदन पाठवून तारीख वाढवण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी निवेदनाची दखल घेऊन १८ जुलै पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवून देण्यात आली आहे तर २० जुलै पर्यंत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख वाढवून देण्यात आली आहे मात्र अर्ज करण्यासाठी किमान ७ दिवस आणखी वाढवून द्यावे व परीक्षा शुल्क कमी करावे ही संघटनेची भूमिका आहे.
परीक्षा शुल्क कमी करण्यासाठी संघटना पहिल्यापासून आग्रही आहे. ऑनलाईन अर्ज करताना अनेक समस्या उद्भवत आहेत. राज्यात वेगवेगळ्या भागात पावसामुळे सुद्धा अडचणी वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी अर्ज करण्याच्या सुविधा नाहीत. नेटवर्क उपलब्ध नाही. सर्व्हर बंद पडत आहे. अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे अर्ज करण्याची शेवटची तारीख आणखी किमान ७ दिवस वाढवून द्यावी. तसेच अर्ज करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करावे. अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) महाराष्ट्र राज्य कमिटी च्यावतीने राज्याध्यक्ष सोमनाथ निर्मळ, राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी केली आहे.