एमजीएम विद्यापीठाच्या मुद्रण चित्राची राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील लिओनार्दो दा विंची स्कूल ऑफ डिझाईनची विद्यार्थीनी भाग्यश्री रमेश घोडके हिचे मुद्रण चित्र ‘स्ट्रगल’ हे नवी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट तर्फे सादरीकरणासाठी निवडण्यात आले आहे. अत्यंत प्रतिष्ठेची ही निवड सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली असल्याने याला मोठे महत्व आहे. `नभः स्पृशं ` असे नाव असलेले हे प्रदर्शन दिनांक १८ जून २०२४ पर्यंत खुले असणार आहे. देशभरातील निवडक महिला मुद्रण चित्रकारांच्या कलाकृती यात मांडण्यात आल्या असल्याने भाग्यश्रीचे हे यश मोठे आहे.

भाग्यश्री घोडके हिच्या चित्राची नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट तर्फे सादरीकरणासाठी निवड झाल्याबद्दल कुलपती अंकुशराव कदम,  कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, संचालक डॉ जे पी संपतकुमार यांनी तिचे अभिनंदन करून तिला तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement

राष्ट्रीय स्तरावरील सादरीकरणासाठी एमजीएम लिओनार्दो दा विंची स्कूल ऑफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांनीच्या चित्राची निवड होणे ही निश्चितपणे कौतुकास्पद बाब आहे. एमजीएमचे विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचे नाव करीत असून ही आम्हां सर्वांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे कुलपती अंकुशराव कदम यांनी यावेळी सांगितले.

मुद्रण चित्र कला प्रकारामध्ये भाग्यश्रीचे प्रभूत्व आहे आणि तिला या कलाप्रकारामध्ये काम करायला आवडते. ती नक्कीच भविष्यात आणखी यश मिळवेल, असा आपल्याला विश्वास वाटतो, अशी माहिती भाग्यश्रीचे मार्गदर्शक प्रा सचिन कांबळे यांनी दिली आहे.

आपण चार वर्ष विद्यार्थी म्हणून या क्षेत्राचा अभ्यास करत आहोत. तो अभ्यास आज सफल झाला, असे वाटत असल्याची भावना भाग्यश्रीने या यशाबद्दल व्यक्त केली आहे. झिंक प्लेट आणि इंकच्या सहाय्याने पेपरवर घेतलेले हे मुद्रण चित्र आहे. आपल्या आईच्या संघर्षाला हे चित्र समर्पित आहे. या संदर्भातील संकल्पना कशी सुचली याची माहिती देताना ती म्हणाली की, स्त्रीयांचा संघर्ष कोणाला दिसत नाही. आपण आपल्या आईला संघर्ष करताना पाहतो. यात आपण कमळाचा आकार दाखवला असून त्याला वेलींनी जखडलेले दाखवले आहे. गुलाबी रंगामध्ये ही मांडणी करण्यात आली आहे.

पुढे बोलताना भाग्यश्री म्हणाली, आपल्याला पुढे या क्षेत्रात पदव्युत्तर अभ्यास करायचा आहे. जॉब करायचा आहे आणि नंतर फ्रीलासींग करायचे आहे. आपल्याला विद्यापीठामध्ये या संदर्भात काम करण्यासाठी आवश्यक इंस्ट्र्युमेंट मिळाले. स्पेस मिळाला. आपल्याकडून या संदर्भातील अभ्यास करवून घेण्यात आला, ते आपल्याला महत्वाचे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page