शिवाजी विद्यापीठात आता बारावीनंतरही शिक्षणाची संधी
९ मे रोजी दसरा चौकात ‘स्कूल कनेक्ट अभियाना’चे आयोजन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०ची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यात येत असून या धोरणाच्या अनुषंगाने येत्या शैक्षणिक वर्षापासून बारावीनंतर पदवी स्तरावरील अनेक महत्त्वाचे नवे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्यात येत आहेत. त्या अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी विद्यापीठाने येत्या गुरूवारी (दि. ९ मे) सायंकाळी ५ वाजता येथील दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे ‘स्कूल कनेक्ट अभियान’ आयोजिले आहे.
शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ श्रीकृष्ण महाजन आणि मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ महादेव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठामध्ये बहुतांश अभ्यासक्रम हे पदव्युत्तर स्तरावरील आहेत. महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठात प्रवेश घेता येत असे. काही वर्षांपूर्वीपासून विद्यापीठात बी टेक अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम तंत्रज्ञान अधिविभागात सुरू आहेत. त्यानंतर स्कूल ऑफ नॅनो-सायन्स अँड टेक्नॉलॉजीअंतर्गत बी एस्सी – एम एस्सी नॅनोसायन्स (पाच वर्षे एकात्मिक) अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. या दोन्ही अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत विद्यापीठांना नवीन व अद्यावत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. या धोरणाला सकारात्मक प्रतिसाद देताना शिवाजी विद्यापीठाने आता २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून बारावीनंतरचे पदवीस्तरीय अनेक अभ्यासक्रम सुरू करण्याचे योजिले आहे. यामध्ये उपरोक्त दोन्ही अभ्यासक्रमांखेरीज बी ए स्पोर्ट्स, बी ए फिल्म मेकिंग, बी कॉम बँकिंग अँन्ड फायनान्स, बी एस्सी – एम एस्सी इकॉनॉमिक्स (पाच वर्षे एकात्मिक), बीसीए, बी एस्सी – एम एस्सी (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग), बी एस्सी – बी एड (चार वर्षे एकात्मिक) आणि एम बी ए (एकात्मिक चार वर्षे) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
याबरोबरच विद्यापीठाच्या ऑनलाईन व दूरस्थ शिक्षण केंद्रामार्फतही ऑनलाईन एमबीए सह इतरही अनेक महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व अभ्यासक्रमांची इच्छुक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना सविस्तर माहिती देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ‘स्कूल कनेक्ट अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत येत्या ९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजिले आहे.
यामध्ये विद्यापीठातील त्या त्या विषयांचे तज्ज्ञ, अभ्यासक्रम समन्वयक आणि अधिविभागांचे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे शंकासमाधानही करतील. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्कूल कनेक्ट अभियान संपन्न होत असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ महाजन व डॉ देशमुख यांनी केले आहे.