शिवाजी विद्यापीठातील मणिपूरच्या विद्यार्थिनीचे नॅनोसायन्समध्ये यश

नॉर्थ ईस्ट मधून आलेली अधिविभागातली पहिली अंतराज्य विद्यार्थिनी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी हा अधिविभाग शास्त्रीय तथा संशोधकीय घडामोडींसाठी कायमच चर्चेत असतो. येथील विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापकांनी अनेक राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केलेलं आहे. त्याचमुळे कोल्हापूर बरोबरच सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, अमरावती, नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई अशा विविध ठिकाणांहून येथे विद्यार्थय्यांचा ओघ वाढतोच आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांबरोबरच कर्नाटक, गोवा, राजस्थान तसेच मणिपूर राज्यातूनही येथे विद्यार्थी शिकण्यास येत आहेत. याच अधिविभागातील नॉर्थ ईस्ट मधून शिकण्यास आलेली पहिली अंतराज्य विद्यार्थिनी म्हणून रीना सौबाम हीचा उल्लेख करता येईल.

रीना सौबाम, इंफाळ, मणिपूर

रीना, ही मूळची इंफाळ, मणिपूर येथील रहिवासी असून तिने स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी येथेच ‘B Sc – M Sc नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी’ हा पाच वर्षांचा एकत्रित अभ्यासक्रम सन २०१७ ते २०२२ दरम्यान पूर्ण केलेला आहे. या उदयोन्मुख अभ्यासक्रमाच्या पुर्णते नंतर लगेचच तिची पुणे स्थित ‘स्प्रिंजर-नेचर’ या आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकाशन कंपनीत, वैज्ञानिक संपादक (Scientific editor) म्हणून निवड झाली आहे. स्प्रिंजर नेचर ही, वैज्ञानिक माहिती आणि संशोधनाचे शोधपत्र तसेच विवरण प्रकाशित करणारी कंपनी आहे. पुणे येथे या स्प्रिंजर नेचर कंपनीची एक शाखा कार्यरत असून, तिथून जगभरातील संशोधन पत्रिकेचा लेखाजोखा आणि विवरण उपलब्ध करून देण्यात येते.

Advertisement

रिनामध्ये असलेल्या अत्यंत चिकाटी व कष्टाळू वृत्तीमुळे त्याचबरोबर स्कूल ऑफ नॅनो सायन्स मध्ये लाभलेल्या योग्य त्या शिक्षण व मार्गदर्शनामुळे, त्याचबरोबर येथील अभ्यासक्रमाचा भाग असणाऱ्या रिसर्च आर्टिकल रीडिंग रायटिंग आणि सेमिनार या उपक्रमामुळे रीनाला हे यश प्राप्त करता आले असे तिने मतप्रकटन केले. रीनाच्या सुरू झालेल्या करिअरचा व तिच्या एकूणच प्रगतीचा हा आलेख पाहून तिच्या पाठोपाठ मणिपूरमधील आणखी ०७ विद्यार्थ्यांनी नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. 

विद्यार्थ्यांच्या एकूणच डेव्हलपमेंट मध्ये कायमच प्रयत्नशील असलेल्या या अधिविभागात बारावीनंतर लगेचच विद्यापीठातलं बहुमोल असे शिक्षण प्राप्त करण्यासाठी मागील काही वर्षांत वरील नमूद राज्यांव्यतिरिक्त इतरही अन्य राज्यातील विद्यार्थ्यांनी नॅनोसायन्स या विषयाला आपली पहिली पसंती दाखवली असून तिकडच्या विद्यार्थ्यांचा स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी अधिविभागाकडे आणि पर्यायाने शिवाजी विद्यापीठाकडे ओघ वाढतो आहे.

आत्ताच्या पिढीतील विद्यार्थी मूळचेच सृजनशील असून त्यांच्यातील वैज्ञानिक सर्जनशीलतेला अधिकाधिक वाव मिळावा व नॅनोटेक्नॉलॉजी बरोबरच विविध बहुविद्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना यश संपादन करता यावे आणि त्यांची वैज्ञानिक प्रगल्भता वाढीस लागावी या उद्देशाने, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी या आधीविभागात, बारावी सायन्स नंतर कोणत्याही प्रवेश परीक्षेशिवाय, पाच वर्षाचा बीएससी-एमएससी असा एकत्रित अभ्यासक्रम सन 2012 पासून सुरू असून त्यासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  2024-25 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे किंवा अधिविभागास प्रत्यक्ष भेट देण्याचेही आवाहन अधिविभागाचे संचालक, प्रा डॉ किरणकुमार शर्मा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page