एमजीएम विद्यापीठात एक दिवसीय राष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न

पत्रकारिता शिक्षणातील गुणवत्ता जपण्यासाठी मिडिया एज्युकेशन कौन्सिलची गरज; एमजीएममधील राष्ट्रीय परिषदेत मान्यवरांचा सूर

छत्रपती संभाजीनगर : माध्यम क्षेत्राची गुणवत्ता जपण्यासाठी ‘मिडिया एज्युकेशन कौन्सिल’ ची नितांत गरज आहे. त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारचे आवश्यक ते शिक्षण घेतल्यानंतरच या परिषदेच्या माध्यमातून प्राप्त परवानगीने पत्रकारिता करता यायला हवी. समकालीन काळामध्ये माध्यमाचे कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेतले नसतानाही अनेक जण पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे संबंधितांकडून होत असलेल्या वार्तांकनामुळे माध्यमांची प्रतिमा काहीशी डागाळली जात असल्याचे अनेक घटनांमधून समोर आलेले आहे. यास रोखणे आवश्यक असून यासाठी पत्रकारितेचे योग्य ते शिक्षण घेत ‘मिडिया एज्युकेशन कौन्सिल’च्या परवानगीने पत्रकारिता करणे ही काळाची गरज असल्याचा सूर एमजीएममध्ये आयोजित राष्ट्रीय परिषदेतील समूह चर्चेत मान्यवरांचा होता.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद महाविद्यालय व इंडियन कम्युनिकेशन काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कम्युनिकेशन फॉर डेव्हलपमेंट’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद विद्यापीठाच्या विनोबा भावे सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या परिषदेचा उद्घाटन सोहळा कुलपती अंकुशराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या परिषदेत ‘नीड ऑफ मिडिया एज्युकेशन कौन्सिल इन इंडिया’ या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले.

Advertisement

या चर्चासत्रामध्ये कोप्पळ विद्यापीठाचे कुलगुरू प्रा बी के रवी, उत्कल युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मिडिया स्टडीजचे संचालक प्रा उपेंद्र पाधी,  जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रा डॉ अर्चना कुमारी, पिडीपियू विद्यापीठाचे प्रा डॉ प्रदीप मलिक, सेंट्रल विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ व्ही एल धारूरकर तर एमजीएम विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ विलास सपकाळ, निमंत्रक प्राचार्या डॉ रेखा शेळके आदि मान्यवरांनी सहभाग घेतला. वरिष्ठ पत्रकार डॉ शाहिद शेख यांनी या चर्चासत्राचे नियंत्रक म्हणून काम पाहिले.

या परिषदेत बोलताना कोप्पळ विद्यापीठाचे कुलगुरू प्रा बी के रवी म्हणाले, माध्यम क्षेत्राचा समाज मनावर प्रभाव प्रभाव पडत असतो. विशेषत: माध्यम क्षेत्र हे नवी रीत तयार करीत असते. आपण माध्यम क्षेत्राच्या माध्यमातून जे काही शिकवत असतो, जे शब्द आणि जी भाषा वापरत असतो ती उद्याच्या पिढीची वहिवाट तयार करीत असते. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय वर्तमानपत्रांच्या किमती कमी आहेत. समकालीन काळामध्ये मराठी, कन्नड, तेलगू अशा सर्वच भारतीय भाषांमधून होत असलेली पत्रकारिता वाढलेली आहे. इंग्रजी माध्यमांच्या तुलनेत भारतीय माध्यमे अधिक प्रभावशाली आणि शक्तिशाली होत असलेली आपण पाहत आहोत.

‘चेंजिंग हॉरिजन्स ऑफ डेव्हलपमेंट कम्युनिकेशन’ पुस्तकाचे प्रकाशन

आजच्या राष्ट्रीय परिषदेत प्रा डॉ व्ही एल धारूरकर आणि डॉ रेखा शेळके यांनी लिहिलेल्या ‘चेंजिंग हॉरिजॉन्स ऑफ डेव्हलपमेंट कम्युनिकेशन’ या इंग्रजी पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले. तसेच यावेळी या परिषदेत सादर करण्यात आलेल्या ७० पेक्षा अधिक शोधनिबंधाच्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

देशभरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारी तज्ञ अभ्यासक, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थ्यांनी या परिषदेत आपला सहभाग नोंदविला. परिषदेचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ रेखा शेळके यांनी तर सूत्रसंचालन जैनब अंसारी यांनी केले. या परिषदेच्या सहनिमंत्रिका म्हणून डॉ.झरताब अंसारी आणि प्रा कविता सोनी यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page