आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे शिवनई येथे आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिर संपन्न
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील प्रकृती वेलनस सेंटर तर्फे दि 25 एप्रिल 2024 रोजी शिवनई ता दिंडोरी येथे आयुर्वेद चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मोफत रुग्ण तपासणी व आयुर्वेदीय औषधी वाटप करण्यात आले. यावेळी 85 पेक्षा अधिक स्थानिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. आयुर्वेदीय चिकित्सा पध्दती जनसामांन्यापर्यंत पोहचावी म्हणून हा उपक्रम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प वि से प, अ वि से प, वि से प आणि प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
सदर शिबिरामध्ये आयुष विभाग प्रमुख डॉ गितांजली कार्ले आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ अनुश्री नेटके यांनी रुग्ण तपासणी केली व आंतरवासियता विद्यार्थी वेदांत जवादे, संगम चव्हाण, यांचे रुग्ण तपासणीसाठी सहकार्य लाभले. सदर गावामध्ये थायरॉईड विकार, संधीवात, मधुमेह, लहान मुलांच्या पोषण विषयकतक्रारी, त्वचा रोग संबधीत रुग्णांना आयुर्वेदीय मार्गदर्शन आणि मोफत औषध वाटप करण्यात आले. तसेच स्थानिकांना आयुर्वेद व योग यांचे महत्व सांगुन आयुर्वेदीय वनस्पतींचे वाटप करण्यात आले.
सदर शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, वित्त व लेखा अधिकारी एन व्ही कळसकर आणि विद्यापीठ शैक्षणिक कक्ष अधिष्ठाता डॉ मृणाल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आयुष विभागातर्फे पीएच डी आयुर्वेद, योगाथेरपी फेलोशिप, पंचकर्म थेरपी फेलोशिप आणि पंचकर्म सर्टिफिकेट आदी अभ्यासक्रम सुरु आहेत अशी माहिती आयुष विभाग प्रमुख डॉ गितांजली कार्ले यांनी यावेळी दिली.
सदर शिबिर यशस्वीरीत्या होण्यासाठी मेघा बोरसे, शितल आभाळे, सागर हाटकर, ज्ञानेश्वर देशमुख, स्थानिक सरपंच चंद्रकांत निंबाळकर आणि खंडेराव गटकळ आदींनी परिश्रम घेतले.