स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात जागतिक ग्रंथ दिन उत्साहात साजरा
पुस्तके, वाचक आणि कर्मचारी यांचा संगम म्हणजे ग्रंथालय – डॉ जगदीश कुलकर्णी
ललित व प्रयोगजिवी कला संकुलात सत्कार
नांदेड : पुस्तके, वाचक आणि ग्रंथालयीन कर्मचारी यांचा त्रिवेणी संगम म्हणजे ग्रंथालय होय. ग्रंथालयाचे स्वरूप काळानुसार बदलत असून नव्या काळात ग्रंथालयेच वाचकांकडे पोहोचत आहेत. ज्ञान समृद्धीसाठी पुस्तकांचा अधिकाधिक उपयोग महत्त्वाचा आहे. असे प्रतिपादन ज्ञानश्रोत केंद्राचे संचालक डॉ जगदीश कुलकर्णी यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजिवी कला संकुलात जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने डॉ कुलकर्णी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख डॉ पृथ्वीराज तौर होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ कुलकर्णी यांनी बदलत्या काळातील ग्रंथालये आणि ऑनलाईन पद्धतीने दिल्या जाणाऱ्या ग्रंथालय सुविधांविषयी प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली. दर्जेदार संदर्भ ग्रंथ, क्रमिक पुस्तके, शोध प्रबंध यांच्या विषयी अद्ययावत माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. याशिवाय अभ्यासक, संशोधक व विद्वान यांनी मान्यताप्राप्त पोर्टलवर स्वतःची माहिती पाठवणे आवश्यक आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोणत्याही गाव शहरातील किंवा शाळा विद्यापीठातील सर्वात सुंदर जागा म्हणून ग्रंथालयांकडे पाहिले गेले पाहिजे, असे डॉ पृथ्वीराज तौर अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले. विद्यापीठातील ग्रंथालय व ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांविषयी त्यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संगीत विभागातील प्रा किरण सावंत यांनी केले. सत्कार सोहळ्यास डॉ अनुराधा पत्की जोशी, डॉ शिवराज शिंदे, डॉ कैलास पुप्पुलवाड, प्रा राहुल गायकवाड, प्रा नामदेव बोंपिलवार, प्रा अभिजीत वाघमारे, प्रा प्रशांत बोंपिलवार, निशिकांत गायकवाड, प्रकाश रगडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.