शिवाजी विद्यापीठात ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे ललित लेखन’ या ग्रंथाचे प्रकाशन
महर्षी शिंदे यांचे वाङ्मयातून त्यांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार – किशोर बेडकिहाळ
कोल्हापूर : ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेखन वैचारिक, सामाजिक आशयाबरोबर वाङ्मयीन गुणवत्तादृष्ट्या श्रेष्ठ स्वरूपाचे होते. महर्षी शिंदे यांच्या संवेदनशील आणि संपन्न व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार त्यांच्या ललित लेखत आहे. त्यांचे वाङ्मय हे करुणेने भरलेले आहे. शिंदे यांची सूक्ष्म अवलोकन दृष्टी, संपन्न अनुभवविश्व व त्यांच्या अंतर्दृष्टीचा आवाका त्यांच्या वाड्यातून व्यक्त झाला आहे. महर्षी शिंदे यांची ललित लेखक म्हणून ओळख विजया पाटील यांच्या ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे ललित लेखन’ या ग्रंथामुळे महर्षी यांच्या आजवरच्या अलक्षित असा वाङ्मयीन स्वरूपावर प्रकार पडणार आहे. असे प्रतिपादन किशोर बेडकिहाळ यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त प्रा एन डी पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रकाशित डॉ विजया पाटील-वाडकर लिखित ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे ललित लेखन’ या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगीचे प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य टी एस पाटील यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बहुजनवादी राजकारण व सामाजिकतेचे वेगळेपण नमूद केले. एकविसाव्या शतकातही निर्भिड विचारांचे दार्शनिक अशी ओळख असणाऱ्या महर्षी शिंदे यांच्या कार्याचे व या ग्रंथाचे अनेक पैलू त्यांनी उलघडून दाखविले.
प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ श्रीकृष्ण महाजन म्हणाले, महर्षी शिंदे यांच्या विचारविश्व आणि लेखनशैलीने महाराष्ट्राचे मन आणि हृदय घडविले आहे. या ग्रंथातून शिंदे यांच्या वाङ्मय कंगोऱ्यांचा उत्तमरित्या परिचय करून दिला आहे. या समारंभाचे प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ रणधीर शिंदे यांनी केले तर परिचय डॉ नंदकुमार मोरे यांनी केला. डॉ विजया पाटील व राहुल पवार यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
आभार राजेश पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे यांनी केले. या समारंभास डॉ अशोक चौसाळकर, डॉ राजन गवस, राहुल पवार, सुरेश शिपुरकर, डॉ माया पंडित, शरद नावरे, डॉ प्रकाश पवार, डॉ भारती पाटील, अशोक वाडकर, वसंतराव मुळीक, तसेच विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी व अनेक मान्यवर उपस्थित होते.