डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचा 15 वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात संपन्न
भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थित 15 वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात संपन्न
पिंपरी/ पुणे : डॉ डी वाय पाटील (अभिमत) विद्यापीठ, पिंपरी, पुणे येथे 15 वा पदवीप्रदान या कार्यक्रमाला भारताचे माजी राष्ट्र्पती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी सोमनाथ एस अध्यक्ष – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), बेंगळुरू यांना त्यांच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आणि सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष तसेच सिम्बायोसिस इंटरनॅशनल अभिमत विद्यापीठाचे कुलपती प्रा डॉ एस बी मुजुमदार यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ठ योगदानाबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी माजी राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी डॉ डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी, पुणे चे कुलपती डॉ पी डी पाटील, प्र-कुलपती डॉ भाग्यश्री पी पाटील, कुलगुरू डॉ एन जे पवार, प्र- कुलगुरू डॉ स्मिता जाधव, सचिव डॉ सोमनाथ पाटील, विश्वस्त व खजिनदार डॉ यशराज पाटील उपस्थितीत होते.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, “ पदवी समारंभ हा मैलाचा दगड जरी असला तरी हा शिक्षणाचा शेवट नाही, ती सतत चालणारी प्रक्रिया आहे उच्च शिक्षण हे उद्याच्या पिढीच्या हाती दिलेली एक मशाल आहे जी समाज आणि देशाच्या हितासाठी प्रकाशमान ठरेल. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी सहानुभूती, नम्रता आणि प्रामाणिकपणा विकसित केला पाहिजे हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचेही ते म्हणाले. आपण भविष्यातील शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा विचार करावा. विद्यार्थ्यांनी आपले निश्चित ध्येय साद्य करण्यासाठी परिश्रम एक शस्त्र घेऊन पुढे जावे तसेच 2047 पर्यंत “विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी सर्व क्षेत्राच्या प्रगतीबरोबर विज्ञान तंत्रज्ञानांच्या जोडीने अग्रेसर राहण्याचा संकल्प केला पाहीजे.
सोमनाथ एस यांना मानद पदवी प्रदान केल्यानंतर ते म्हणाले की, मिळालेली ही पदवी केवळ त्यांच्यासाठीच नाही तर इस्रोमध्ये काम करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांसाठी आहे. अलिकडच्या वर्षांत, भारताने अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. भारत “अमृत काल” साध्य करण्यापासून फार दूर नाही कारण आपण भारतात प्रत्येक गोष्टीची रचना, विकास आणि अंमलबजावणी करत आहोत.
सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ एस बी मुजुमदार यांनी डॉ डी वाय पाटील विद्यापीठाने दिल्या जाणाऱ्या जागतिक शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यात शिक्षकांची भूमिके बाबतीत त्यानी कौतुक केले. शिक्षणाबरोबरच ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञान आणि कौशल्ये देखील प्रदान करत आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना उद्याचा सामना करण्यास मदत होईल.तसेच ते पुढे म्हणाले शिक्षण ही आयुष्याला दिशा देण्याच्या बरोबरीने स्वतःला घडविण्याचे काम करते. आज या विद्यापीठातून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन आपले यश साध्य करीत आहे. या समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 21 विद्यार्थ्यांना या वेळी सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले विविध विद्याशाखेतील 5326 स्नातकांना पदवी प्रदान देण्यात आली यामध्ये 30 विद्यावाचस्पती (पीएच.डी.), 4433 पदव्युत्तर पदवी, 853 पदवी व 10 पदविका या अशा एकूण 8 विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात एका ‘शारदा स्तवन’ राष्ट्रगीत आणि विदयापीठ गीताने झाली. त्यापूर्वी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले आणि पदवी प्रदान समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.तसेच कुलगुरूंनी विदयापीठाचा अहवाल सादर केला. त्यांच्या अहवालात, त्यांनी नमूद केले की डीपीयु ला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC) द्वारे चार-पॉइंट स्केलवर ३.६४ च्या CGPA सह ‘A++’ ग्रेडसह मान्यता देण्यात आली आहे. ऑल इंडिया एनआयआरएफ (NIRF) रँकिंग २०२३ मध्ये, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे (अभिमत विद्यापीठ) यांनी वैद्यकीय श्रेणीमध्ये १५ वा, दंत श्रेणीमध्ये ३ री श्रेणी आणि विद्यापीठ श्रेणीमध्ये ४६ वा क्रमांक मिळविला आहे. डीपीयु ला UGC द्वारे स्वायत्तता श्रेणीचे विद्यापीठ घोषित आहे ही माहिती दिली.