उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यशाळा संपन्न
जळगाव : शैक्षणिक २०२४-२५ पासून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदवीस्तरावर लागू होणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सविस्तर माहिती व्हावी यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने दि. १८ व १९ मार्च रोजी तीनही जिल्हयात ९ महाविद्यालयांमध्ये १०८ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेद्वारे १८०९ शिक्षकांशी संवाद साधून हे धोरण पोहचविण्यासाठी विद्यापीठाने महत्वाचे पाऊल उचलले आहे.
नवीन शैक्षणिक वर्षात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. शिक्षकांना या धोरणाची माहिती व्हावी यातील, बदल स्वीकारून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे शिक्षकांच्या शंकाचे निरसन करावे या हेतूने दि. १८ व १९ मार्च रोजी जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्हयातील ९ महाविद्यालयांमध्ये या कार्यशाळा एकाच वेळी घेण्यात आल्यात. या कार्यशाळेत १०८ महाविद्यालयांच्या शिक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या पूर्वी कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि कार्यशाळेत मार्गदर्शन करणाऱ्या तज्ञांची बैठक होवून त्यामध्ये आराखडा निश्चित करण्यात आला.
चार अधिष्ठातांसह विद्यापीठातील काही प्राध्यापक असे मिळून असे एकूण ९ तज्ज्ञ या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन करतील असे निश्चित करण्यात आले. त्याप्रमाणे या कार्यशाळा घेण्यात आल्या. नंदुरबार जिल्हयातील कार्यशाळेसाठी कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांनी स्वत: मार्गदर्शन केले. अभ्यासक्रमातील संरचनात्मक बदल, अभ्यासक्रमातील लवचिकता आणि क्रेडीट हस्तांतरण, भारतीय भाषेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण, समग्र आणि बहुविद्याशाखीय शिक्षण, व्यावसायिक कौशल्य, स्वयंम अथवा इतर प्लॅटफार्मद्वारे ऑनलाईन शिक्षण तसेच इंटर्नशिप यावर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांची देखील या कार्यशाळेत विशेष उपस्थिती होती.
या दोन दिवसीय कार्यशाळामध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. नवीन धोरणाची समज वाढविण्यासाठी कार्यशाळेचा लाभ झाल्याची प्रतिक्रीया शिक्षकांनी व्यक्त केली. हे धोरण राबवितांना असलेली आव्हाने आणि त्यावरील उपाय याबाबतही चर्चा झाली. अपुरी संशाधने, तंत्रज्ञान व डिजीटल उपकरणांची असमानता, व्यापक प्रशिक्षणाची गरज, आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन डिझाइन आणि अंमलबजावणी अशी काही आव्हाने असल्याचे समोर आले.
तर त्यावरील उपाय म्हणून या शैक्षणिक धोरणाची माहिती सर्व घटकांपर्यंत व्हावी यासाठी अजून कार्यशाळ, परिसंवाद घेण्यात यावे, सोशल मिडीयाद्वारे अधिक माहिती पोहचती करावी, शिक्षकांना वेळोवेळी मार्गदर्शन प्रधान करणे, शिक्षक विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, आवश्यक त्या ठिकाणी स्वयंसेवी संस्था व खाजगी संस्थासोबत भागिदारी करणे, समिती स्थापन करणे असे काही उपाय सुचविण्यात आलेत. या कार्यशाळेनंतर कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कालमर्यादा आणि जबाबदाऱ्यांची रूपरेषा निश्चित करावी, शिक्षक आणि इतर भागधारकांची धोरणाबाबतची समज वाढविण्यासाठी कार्यशाळा घेण्यात याव्यात. अभ्यासक्रम एकत्रिकरण व तंत्रज्ञान एकत्रिकरण निश्चित करावेत, पालक, शिक्षक संघटनांच्या कार्यशाळा घ्याव्यात, शिक्षणातील संशोधन व नवकल्पना यांना प्रोत्साहन द्यावे अशाकाही पुढील पायऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने घेतलेल्या पुढाकारामुळे पदवीस्तरावर या धोरणाची अंमलबजावणी करणे निश्चितच सोपे होणार आहे.