एमजीएम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सर केला भंडारदरा – रतनगड किल्ला
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या क्रीडा, शारीरिक शिक्षण, योग विज्ञान, अडव्हेंचर्स स्पोर्ट्स, सामाजिक शास्त्र व मानव्य विद्या आणि स्कूल ऑफ लिगल स्टडीज अँड रिसर्च विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी दिनांक ५ व ६ मार्च २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली रतनगड किल्ल्याची मोहीम यशस्वीपणे संपन्न झाली. यामध्ये सुमारे ५० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांसह यावेळी सहा प्राध्यापक मोहिमेमध्ये सहभागी होते. भंडारदरा – रतनगड मोहिमेची सुरूवात अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, क्रीडा संचालक नितीन घोरपडे, संचालिका डॉ. झरताब अंसारी, क्रीडा विभागप्रमुख डॉ. दिनेश वंजारी, डॉ. सदाशिव झवेरी व. डॉ. श्रीनिवास मोतीळे यांनी हिरवा झेंडा दाखवून केली.
अशा मोहिमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निसर्ग जवळून अनुभवता येतो, स्वत:तील नेतृत्व गुणांना चालना देता येते, पर्यावरणासंदर्भात जागृती, वैयक्तिक तसेच व्यक्तिमत्व विकास साधण्याची संधी मिळत असते. विद्यापीठ कायम अशा प्रकारचे उपक्रम राबवित आलेले आहे. या दोन दिवसीय मोहिमेत विद्यार्थ्यांनी कॅम्पिंग, ट्रेकिंग, झिपलाईन, रॅपलिंग अशा विविध उपक्रमांसह वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपला उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या मोहिमेमध्ये विद्यापीठाचे अमोल चौधरी, डॉ. शितल खांडरे,डॉ. प्रतिभा मेहेत्रे, प्रा. सय्यद रहीमुद्दीन, हृदयनाथ सोनुणे सहभागी होते. ही मोहिम अडव्हेंचर इंचार्ज डॉ. शशिकांत सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाली.