खेलो इंडिया विद्यापीठीय स्पर्धेसाठी एमजीएमचा संघ गुवाहाटीला रवाना
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा तलवारबाजी खेळणाऱ्या मुलींचा संघ गुवाहाटी येथे दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ ते दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. स्पर्धेसाठी रवाना झालेल्या संघामध्ये श्रुती जोशी, वेदिका जाधव आणि स्नेहल पाटील या खेळाडूंचा समावेश आहे. गुवाहाटी येथील स्पर्धेसाठी रवाना झालेल्या एमजीएमच्या संघाने या आधी तलवारबाजीच्या सायबर प्रकारात दक्षिण – पश्चिम आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये कास्य पदक प्राप्त केले आहे. त्याचप्रमाणे या संघाने गुरूनानक देव विद्यापीठ, अमृतसर येथे आपली उत्कृष्ट कामगिरी करीत खेलो इंडिया विद्यापीठीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यावेळी म्हणाले की, खेलो इंडिया विद्यापीठीय स्पर्धेत एमजीएमचा तलवारबाजीचा संघ पहिल्यांदाच सहभागी होत असून विद्यापीठाचे खेळाडू विविध स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी करीत आहेत. या स्पर्धेमध्ये एमजीएमच्या संघाने आपले स्थान निश्चित करणे ही विद्यापीठासाठी आनंदाची बाब आहे. खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र झाल्याबद्दल तलवारबाजी संघांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो.
एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.जॉन चेल्लादुराई, क्रीडा संचालक नितीन घोरपडे, प्रा.निलेश हारदे, डॉ.शशिकांत सिंग, डॉ.श्रीनिवास मोतीळे आदि मान्यवरांनी खेळाडूंना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गुवाहाटी येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी संघासमवेत क्रीडा विभागप्रमुख प्रा. दिनेश वंजारे हे असणार असून त्यांनी या खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे.