मुलींच्या शिक्षणाकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक – उप जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव
शेंद्रा गावातून झाली बालविवाह प्रतिबंध जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात
छत्रपती संभाजीनगर : शेतकरी आपल्या पिकांची ज्या पद्धतीने काळजी घेतात त्याप्रमाणे पालकांनी मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद महिला व बाल विकास उप जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांनी यावेळी केले. एमजीएम ९०.८ एफएम रेडिओ, रानवारा ८९.६ एफएम, स्मार्ट युनिसेफ आणि जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होत असलेल्या बालविवाह प्रतिबंध जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन शेंद्रा ग्रामपंचायत सभागृह येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी महिला व बाल विकास उप जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, सरपंच पुष्पा कचकुरे, विस्तार अधिकारी हनुमंत शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.चंद्रकला जाधव, उपसरपंच सर्जेराव कुचेकर, एमजीएम रेडिओचे केंद्रप्रमुख सुनील शिरसीकर, रेडिओ रानवाराचे कार्यक्रम प्रमुख भूषण पवार, ग्रामस्थ व सर्व संबंधित उपस्थित होते. यावेळी बोलताना महिला व बालकल्याण अधिकारी सुवर्णा जाधव म्हणाल्या, मुली आज सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे काम करीत आहेत. राज्य आणि केंद्र शासन मुलींच्या शिक्षणासाठी अनेक प्रकारे सहाय्य करत आहे. तसेच बालविवाहासंदर्भात तक्रार करण्यासाठी १०९८ या हेल्पलाइनला फोन करून आपण माहिती देऊ शकता. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाते.
पालकांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षित करणे आवश्यक असून ते आपल्या करियरमध्ये यशस्वी होईपर्यंत त्यांच्या लग्नाचा विचार करायला नाही पाहिजे. मुलं आणि मुली करीयरच्या बाबतीत यशस्वी झले की आपल्या आयुष्याचे निर्णय ते घेऊ शकता. समकालीन काळामध्ये पालकांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत असले तरी मुलींचे लग्न लवकर करणे हा त्यावरील उपाय नाही. बालविवाह प्रतिबंध जनजागृती हा उपक्रम आपल्या गावापुरता मर्यादित न ठेवता सगळ्यांनी आपल्या आसपासच्या वाड्यावस्तीवर याबद्दल जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या डॉ. चंद्रकला जाधव म्हणाल्या, मुलींनी आपल्या शिक्षणाला प्राधान्य देत अगोदर आपले शिक्षण पूर्ण केले पाहिजे. शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्न करायचे नाही हा दृढनिश्चय करीत शिक्षण घेत असताना केवळ आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. समाजामध्ये वावरत असताना आपल्या पालकांची सामाजिक प्रतिष्ठा वाढली पाहिजे असे काम आपल्या हातून घडण्यासाठी सर्वांनी मेहनत घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे आभार ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष राम कुचेकर यांनी मांडले तर सूत्रसंचालन आरजे अमृता यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सुनीता परदेशी, अंगणवाडी सेविका, उमेद आणि महावीम बचत गटाच्या अध्यक्षा, महिला, अश्विनी निटूरकर, आरजे अदनान, आरजे मनीषा व ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.