भारती विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात स्नेहधाम ऊर्जा कट्टा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन
स्नेहधाममुळे ज्येष्ठांची मने प्रफुल्लित होतील – विजयमाला कदम
पुणे : ज्येष्ठांना मायेचा, आपुलकीचा आधार स्नेहधाम ऊर्जा कट्टयामुळे मिळतो आहे त्यातून ज्येष्ठांची मने प्रफुल्लित होतील याची खात्री आहे असे मत भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठाच्या एरंडवणे पौड रोड येथील शैक्षणिक संकुलातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ना. ग. नारळकर फौंडेशन आणि भारती विद्यापीठ यांच्या एकत्रित उपक्रमातून साकारलेले स्नेहधाम ऊर्जा कट्टा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या अध्यक्षा स्वप्नाली कदम, संचालिका डॉ. सविता नाईकनवरे आणि डॉ. अनुराधाताई नारळकर आणि माजी मुख्याध्यापिका स्नेहलता पवार उपस्थित होते.
कदम पुढे म्हणाल्या, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे घरात अनेक नातलग असल्यामुळे ज्येष्ठांना विचारविनिमय करण्यासह आधार मिळायचा. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आणि त्यात मुले नोकरी व्यवसायामुळे बाहेरगावी असतात त्यामुळे ज्येष्ठांना एकाकीपणाचा सामना करावा लागतो आहे. अशा वेळी स्नेहधामसारख्या सामाजिक सेवाभावी संस्था ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे. डॉ.पतंगराव कदम यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. जे करायचे ते समाजासाठी करायचे याच प्रेरणेतून कदम परिवाराने स्नेहधामला केंद्र सुरु करण्यासाठी जागा देऊन मदत केली आहे. या केंद्राचे काम समन्वयक श्रीकांत कुलकर्णी ९८८१७३६०५८ पाहणार आहेत तरी इच्छुकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा. ८ फेब्रुवारीस परिसरातील ज्येष्ठ नागरीकांसाठी केंद्राच्या स्वरूपाबद्दल माहिती देणारे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
स्नेहधामची पहिली शाखा आपटे रोड येथे ५ वर्षापासून चालू आहे तर दुसरी शाखा कल्याणीनगर येथे सुरू झाली असून त्यांना ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिथल्या ज्येष्ठांच्या आवडीनुसार त्या केंद्राचे कार्यक्रम आखले जातात. ज्येष्ठांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेतली जाते. त्यासाठी दररोज मेडिटेशन, योगाभ्यास, चर्चासत्रे, अनुभवी व्यक्तींची विविध विषयावरील व्याख्याने त्याचबरोबर कॅरम, पत्ते, माइंड-जिम, गाण्यांच्या भेंड्या आणि इतर करमणुकीचे कार्यक्रमही घेतले जातात. यामुळे तणावमुक्ती कमी व्हायला मदत होते. आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस हे केंद्र दुपारी ४ ते ६ चालू असेल. स्नेहधामचे सर्वात ज्येष्ठ आणि उत्साही सभासद ९६ वर्षांचे आहेत.
स्नेहधामचे यश त्यातील अनुभवी ज्येष्ठ नागरिक देत असलेल्या भरीव योगदानात असल्याची भावना केंद्राच्या संचालिकांनी व्यक्त केली. याप्रसंगी सुहाना सफर गाण्यांचा कार्यक्रमही सादर झाला त्यात मान्यवरांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रास्ताविक डॅा. सविता नाईकनवरे यांनी केले तर आभार रंजना बाजी यांनी मानले. सूत्रसंचालन शुभदा उकिडवे यांनी केले.