एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या अनवट शान्ताबाई सांगितिक कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
छत्रपती संभाजीनगर : कुणास काय ठाउके कसे, कुठे, उद्या असू ?
निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसू
तुझ्या मनींच राहिले तुला कळेल गीत हे
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे
अशा शब्दांच्या सोबतीला व्हायोलिनच्या आर्त स्वरांनी शहरवासीयांना कवयित्री शांता शेळके यांच्या गावी जाण्याची संधी ‘अनवट शान्ताबाई’ या विशेष सांगितिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली. यशवंतराव चव्हाण सेंटर, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय व मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ कवयित्री व लेखिका दिवंगत शांताबाई शेळके यांचा लेखन प्रवास उलगडणारा ‘अनवट शान्ताबाई’ हा विशेष सांगितिक कार्यक्रम आज एमजीएमच्या आईनस्टाईन सभागृहात रसिकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला.
यावेळी, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, प्रा.प्रल्हाद लुलेकर, प्रा. दासु वैद्य,नीलेश राऊत, प्रा. शिव कदम, डॉ.आनंद निकाळजे, श्रीकांत देशपांडे, महेश अचिंतलवार, गणेश घुले, सुबोध जाधव, नीता पानसरे व सर्व संबंधित उपस्थित होते. शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आज या कार्यक्रमाच्या २८ व्या भागाचे सादरीकरण आज येथे रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले. शांताबाईंचे जगणे आणि त्यांची कविता यांचा अनुबंध शांताबाईंच्याच शब्दांतून यावेळी मांडला गेला. शांताबाईंचे ‘धुळपाटी व संस्मरणे’ हे आत्मचरित्रपर लेखन आणि त्यांच्या कविता या कार्यक्रमात सादर करण्यात आल्या. या सांगीतिक कार्यक्रमाचे सादरीकरण कार्यक्रमाची संहितालेखन करणाऱ्या डॉ.वंदना बोकिल-कुलकर्णी, अनुराधा जोशी, गौरी देशपांडे आणि दिपाली दातार यांनी केले तर त्यांना व्हायोलिनची साथ अनुप कुलथे यांनी दिली. आज झालेल्या कार्यक्रमात कविता, गीत, गद्य वाचनाच्या लयीची जादू रसिकांना प्रत्यक्षपणे अनुभवता आली. ‘साहित्यालाच माझ्या जीवनात महत्वाचे स्थान आहे, साहित्याइतके मला कोणी भारावून गेले नाही’ असे मानणाऱ्या कवयित्री शांताबाई शेळके रसिकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुभवता आल्या!