यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ‘एआय’ वापरावर प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न
नाशिक, २२ मे २०२५ ; यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ‘शैक्षणिक – प्रशासकीय कार्य उत्कृष्टतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए.आय.) वापर’ या विषयावर प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते झाले. प्रा. राम ताकवले संशोधन व विकसन केंद्राच्या वतीने ही कार्यशाळा घेण्यात आली.
उद्घाटनप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले, स्कूल ऑफ डिजीटल एज्युकेशनच्या संचालिका प्रा. कविता साळुंके, प्रा. जयदीप निकम, प्रा. गणेश लोखंडे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील, तसेच महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एम.के.सी.एल.) चे तज्ज्ञ श्रीमती रेवती नामजोशी, श्री. सौम्यारंजन पानी, श्री. अविनाश देशमुख व श्री. मोहसीन शेख उपस्थित होते.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले, “माहितीचा विदा ही भविष्यातील नवी संपत्ती असून, एआयचा प्रभावी वापर त्या विद्यावर आधारित असेल. एआयचे ज्ञान असलेल्या व्यक्तींनाच भविष्यात नोकरीच्या संधी मिळतील. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर विधायक आणि सकारात्मक हेतूने होणे अत्यावश्यक आहे.”

श्रीमती रेवती नामजोशी यांनी एआयवर आधारित शिक्षण अधिक संवादी व अनुभवप्रधान होईल असे सांगत विद्यार्थ्यांच्या भाव-भावना समजून घेणारे एआय शिक्षणात क्रांती घडवू शकते, असे प्रतिपादन केले.
दुपारच्या सत्रात एम.के.सी.एल.चे तज्ज्ञ श्री. सौम्यारंजन पानी, श्रीमती नामजोशी आणि श्री. मोहसीन शेख यांनी उपस्थितांना चॅट जीपीटी, गुगल जेमिनी, डीपसीक इत्यादी टूल्स वापरून मजकूर निर्मिती, पीपीटी डिझाईन, मसुदा लेखन, पत्र व ईमेल तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.

त्यानंतर विद्यापीठाच्या प्रयोगशाळांमध्ये विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, शैक्षणिक संयोजक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी एआय आधारित प्रात्यक्षिके घेण्यात आली.
प्रास्ताविक प्रा. कविता साळुंके यांनी केले तर सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन प्रा. वसुदेव राउत यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. विजय भाकरे, श्री. तन्मय बोरसे, श्री. ऋतिक घुगे, राधिका शिंदे, वृषाली सोनवणे, डॉ. योगेश वाघडकर, रंजिता राठोड आणि उज्वला महाजन यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यशाळेला विद्यापीठातील विविध विभागांचे संचालक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, शैक्षणिक संयोजक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.