यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ राबवणार स्कूल कनेक्ट अभियान
नाशिक : राज्यातील महाविद्यालयांमधील स्थूल नोंदणी प्रमाण वाढविण्यासाठी व राज्यात राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 धोरणामुळे होणाऱ्या शैक्षणिक बदलांबाबत व त्याच्या सकारात्मक परिणामबाबत माहिती होण्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट) हे संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. इयत्ता बारावीला असलेले अथवा बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. “ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्याचे कार्य यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अविरतपणे पार पाडत आहे समाजातील ज्या घटकांकडे शिक्षण पोहोचले नाही त्यांच्यापर्यंत पोहोचून गरजेनुसार शिक्षण देत खऱ्या अर्थाने लोक विद्यापीठ होण्यासाठी प्रयत्नशील आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठे स्कूल कनेक्ट उपक्रमात सहभागी होऊन आपल्या परिक्षेत्रातील जिल्ह्यात याची अंमलबजावणी करणार आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र राज्य असल्याने कार्यक्षेत्रात एकूण 36 जिल्हे येतात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय वा शाळांशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत अधिकाधिक पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठरवीत आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ स्तरावर नियोजन करण्यात आले असून शासनाने निर्धारित केलेली खालील उद्दिष्टे पूर्ती करण्यासाठी विद्यापीठ व संलग्नित परिसंस्था एकत्रितपणे काम करत आहे.
त्याअनुषंगाने मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन हे या समितीचे अध्यक्ष असतील. या समितीमध्ये विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेचे संचालक तसेच विद्यापीठाच्या 8 विभागीय केंद्राचे विभागीय संचालक तसेच वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार हे सदस्य असतील. सदर समितीची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. यात अभियानाची माहिती, नियोजनाची माहिती, प्रत्यक्ष अंमलबजावणी, कार्यक्रमानंतरचा अभिप्राय संकलन व अहवाल सादरीकरण या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच साधन व्यक्तींच्या ऑनलाईन बैठकीची तारीख निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी या अभियानाबाबत उपस्थितांना सविस्तर माहीती दिली. त्यानंतर कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी या अभियानात आणखी नाविन्यपुर्ण काय करता येईल, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले, उपस्थितांच्या सूचना देखील ऐकूण घेतल्या.
स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट) अभियानाची उदिष्टे –
१. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मधील विद्यार्थी केंद्री बदलांविषयी आणि त्यांच्या हितकारक परिणामांविषयी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणे.
२. विद्यापीठांनी तयार केलेल्या अनुभवाधिष्ठित, बहुविद्याशाखीय लवचिक अभ्यास क्रमाविषयी सविस्तर माहिती देणे.
३. अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेली कल्पक, व्यवसायिक आणि कौशल्यावर आधारित संबोधनाविषयी विशेषत्वाने माहिती देणे.
४. मूल्य मापनातील श्रेयांक पद्धती आणि त्यामुळे आलेली लवचिकता समजून सांगणे.
५. कुटुंबाला आधार देण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडून रोजगाराकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना मुक्त दूरस्थ शिक्षणाच्या संधी विषयी माहिती देणे, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे.
६. विद्यार्थीसाठी उपलब्ध असणाऱ्या शिष्यवृत्ती विषयी सविस्तर माहिती देणे.
७. विद्यापीठाच्या विद्यार्थी सहायता कक्षाविषयी माहिती देणे.
८. विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधी विषयी माहिती देणे.
सर्व वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार विभागीय केंद्र यांनी आपल्या विभागाअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संपर्क व समन्वय साधून कनिष्ठ महाविद्यालयांची यादी तयार करून मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना यात जोडणे बाबत सूचीत करण्यात आले. त्याठिकाणी कार्यशाळेचे आयोजना करावे, यासाठी स्थानिक साधन व्यक्तींची यादी तयार करावी असे ही सूचविण्यात आले. शेवटी अभियान यशस्वीतेसाठी कुलगुरू आणि प्र-कुलगुरूंनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सदर बैठकीस डॉ. जयदीप निकम, संचालक, निरंतर शिक्षण विद्याशाखा व आरोग्यविज्ञान विद्याशाखा, डॉ. प्रकाश देशमुख, प्र. कुलसचिव तथा संचालक, विद्यार्थी सेवा विभाग, डॉ. राम ठाकर, संचालक, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्र, इमरटस प्रा. कविता साळुंखे, संचालक, स्कूल ऑफ ऑनलाइन लर्निंग आणि प्रो. राम ताकवले रिसर्च सेंटर, डॉ. संजीवनी महाले,प्र. संचालक, शिक्षणशास्त्र विद्याशाखा, श्री. माधव पळशीकर, प्र. संचालक, संगणक विद्याशाखा, डॉ. माधुरी सोनवणे, प्र. संचालक, कृषीविज्ञान विद्याशाखा, श्री. नागार्जुन वाडेकर, प्र.संचालक, मानव्यविद्या व सा. शास्त्र विद्याशाखा, डॉ. सुरेंद्र पाटोळे, प्र. संचालक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, श्रीमती चेतना कामळस्कर, प्र.संचालक, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, डॉ. फुलसिंह रघुवंशी, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, अमरावती विभागीय केंद्र, डॉ. रमेश शेकोकार, प्र. विभागीय संचालक छ. संभाजी नगर विभागीय केंद्र, डॉ. वामन नाखले, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, मुंबई विभागीय केंद्र, डॉ. नारायण मेहेरे, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, नागपूर विभागीय केंद्र, डॉ. प्रमोद रसाळ, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, नाशिक विभागीय केंद्र, डॉ. विश्वास गायकवाड, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, पुणे विभागीय केंद्र, डॉ. राजा कुलकर्णी, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, कोल्हापूर विभागीय केंद्र, डॉ. यशवंत कलेपवर, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, नांदेड विभागीय केंद्र हे बैठकीस उपस्थित होते.